धुळे दर्पण न्यूज :-
 धुळे शहरातील साक्री रोड महानगरपालिकेत 26 सप्टेंबर, गुरुवारी दुपारी 1 वाजता स्वर्गीय दिलीप पायगुडे सभागृहात स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली. या सभेचं अध्यक्षस्थान महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी भूषवले. यावेळी आयुक्त मॅडम वीसी (व्हिडिओ कॉन्फरन्स) बैठकीत व्यस्त असल्यामुळे सभा दोन तास उशिरा सुरू करण्यात आली.

   सभेची सुरुवात नवनियुक्त सहाय्यक आयुक्त स्वाहा लिहा मालगावे आणि नवनियुक्त नगररचना सहाय्यक महेंद्र परदेशी यांचे स्वागत करून करण्यात आली. महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी या दोघांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

   सभेत एकूण 26 विषयांचा समावेश असलेल्या विषय पत्रिकेवर चर्चा करण्यात आली. बैठकीत या सर्व विषयांना सखोल चर्चा करून मंजुरी देण्यात आली. बैठकीत प्रमुख चर्चेचा मुद्दा म्हणजे धुळे शहरातील कुत्र्यांच्या लसीकरणाचा होता. उपायुक्त हेमंत निकम यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती सादर केली. त्यांच्या मते, सध्या धुळे शहरात अंदाजे 25,000 कुत्र्यांचे अस्तित्व आहे आणि त्यापेक्षा जास्त असलेल्यांचाही अंदाज घेऊन लसीकरणाची योजना तयार करण्यात येणार आहे.

   लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी एक 10 सदस्यीय विशेष टीम तयार करण्यात आली आहे. या टीममध्ये कुशल डॉक्टरांचा समावेश असून ते शहरभरात कुत्र्यांचे लसीकरण करतील. हा प्रकल्प शहरातील रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे, कारण रस्त्यांवर फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे रोगप्रसाराचा धोका वाढू शकतो.

   संपूर्ण सभा एक तास चालली आणि सर्व 26 विषयांना मंजुरी देण्यात आली. यात आर्थिक, सामाजिक आणि नागरी सुविधांच्या विकासाशी संबंधित विविध विषयांचा समावेश होता. महापालिकेने शहरातील नागरी समस्यांवर लक्ष केंद्रित करून विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत आणि त्यासंबंधीच्या निर्णयांना यावेळी मान्यता देण्यात आली.

- Advertisement -

   महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी या महत्त्वपूर्ण बैठकीत शहराच्या विकासासाठी आवश्यक त्या सर्व निर्णयांना गती दिली.