धुळे: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून, माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी शहरातील तरुणांना हक्काचे पैसे वसूल करण्याचा सल्ला दिला आहे. गोटे यांनी आपल्या एका पत्रकाद्वारे धुळे शहरात घडलेल्या घटनांवर भाष्य करत, तरुण मतदारांना या निवडणुकीत आपला हक्क मिळवण्याची ही योग्य संधी असल्याचे सांगितले.
अनिल अण्णा गोटे यांनी माजी विधानसभा निवडणुकीत आपल्याविरोधात कसा प्रचार करण्यात आला, हे उलगडले. "मागील निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी धुवाधार पैसे वाटले, आणि मुसलमान उमेदवाराला देखील समर्थन दिले. भाजपानेही माझ्यावर अन्याय केला आणि माझी जागा शिवसेनेला सोडली," असे ते म्हणाले. गोटे यांनी भाजपवर आरोप करत म्हटले की, "भाजपने धुळ्याचे हिंदू मतदार फारूख शाह यांच्या हातात दिले आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात गुंडगिरीच्या आरोपांमुळे ओळखल्या जाणाऱ्या फारूख शाह निवडून आले."
गोटे यांनी यावेळी शहरातील गणेशोत्सव, दहिहंडी उत्सवात पैसे कसे वाटले गेले यावर भाष्य केले. "दहा हजारांपासून पन्नास हजारांपर्यंत वर्गणी गोळा करून, पैसे वाटण्याचा प्रकार सामान्य झाला आहे. आता तर, तेच पैसे तुमच्याच कष्टाचे आहेत. तुम्हीच त्यांचा योग्य वापर करा," असे ते म्हणाले.
तरुणांसाठी सुवर्णसंधी
गोटे यांनी तरुणांना संबोधित करत म्हटले, "आता तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. दसऱ्याचे सोनं वाटण्यासाठी अजून थोडा वेळ आहे. पण तत्पूर्वी संधीचे सोनं वाटून घ्या. यापुढे अशी संधी पुन्हा मिळणार नाही." त्यांनी पुढे म्हटले की, "आता तुमच्याकडे संधी आहे पैसे वसूल करण्याची. तुम्ही राष्ट्रीय कार्यात हातभार लावत आहात. त्यामुळे तुम्ही जोराने कामाला लागा!"
धुळे शहरातील राजकीय स्पर्धा अधिकाधिक तीव्र होत चालली असून, या निवडणुकीत तरुण मतदारांचे महत्व अधिक आहे. अनिल अण्णा गोटे यांच्या या वक्तव्याने शहरातील राजकीय वातावरणात एक वेगळीच चर्चा रंगली आहे.
