धुळे दर्पण न्यूज :-   साक्री तालुक्यातील जैताणे गावात आदिवासी भिल समाजाच्या अजय राजेंद्र भवरे या तरुणाला बेदम मारहाण करून त्याची हत्या झाल्यानंतर गावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी समाजाने आक्रमक पवित्रा घेत रास्तारोको आंदोलन करत रस्त्यावर टायर जाळून आपला संताप व्यक्त केला. या घटनेने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले असून, स्थानिक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकाने बंद ठेवली आहेत.

   अजय भवरे (वय 20, रा. भिलाटी, वासखेडी रोड, जैताणे) हा तरुण 18 सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजता आपल्या प्रेयमीसोबत गप्पा मारत होता. यावेळी गावातील तुकाराम बाळू शिंदे, वैभव तुकाराम शिंदे, रावसाहेब बाळू शिंदे आणि रविंद्र चैत्राम धनगर या चौघांनी अजयला आडवून त्याचे नाव गाव विचारले. अजय हा आदिवासी भिल समाजाचा असल्याचे समजताच या चौघांनी त्याला जातीवाचक शिवीगाळ करत धमक्या दिल्या आणि लाकडी काठीने तसेच हाताबुक्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत अजय गंभीर जखमी झाला आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोन दिवस उपचार सुरू असतानाही 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.

   अजयच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी व आदिवासी समाजबांधवांनी एकत्र येऊन आंदोलन सुरू केले. त्यांनी रस्त्यावर उतरून टायर जाळले, तसेच रास्तारोको करून आपला निषेध नोंदवला. या आंदोलनामुळे संपूर्ण जैताणे गावात तणावाचे वातावरण पसरले असून, भयभीत होऊन स्थानिक व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले आहेत.

   घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांबळे, निजामपूर पोलिस ठाण्याचे सपोनि मयुर भामरे आणि पोसई प्रदीप सोनवणे यांच्यासह पोलिस दल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि आश्वासन दिले की आरोपींना कठोर शिक्षा दिली जाईल. दरम्यान, पोलिसांनी तातडीने तुकाराम शिंदे, रावसाहेब शिंदे आणि रविंद्र धनगर या तिघांना अटक केली असून चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

   या घटनेने गावात असंतोष पसरला असून, आंदोलकांनी पोलिस ठाण्यावर धडक देऊन आरोपींना त्यांच्यासमोर उभे करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी मात्र कायदा सुव्यवस्था हाताळण्याचे आवाहन करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अद्याप गावात तणावपूर्ण शांतता आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

   या घटनेनंतर आदिवासी समाजामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यांनी न्याय मिळवण्यासाठी ठाम पवित्रा घेतला आहे.