धुळे दर्पण न्यूज :- जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे पोलिस दलाने अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात कारवाई करत गुन्हेगारी आणि अनैतिक धंद्यांविरोधात आघाडी घेतली आहे. शिरपूर तालुक्यात गांजाच्या शेतीचा पर्दाफाश केल्यानंतर, पोलिसांनी आणखी एक महत्त्वपूर्ण कारवाई करत मोहाडी हद्दीतील एमआयडीसी परिसरात लाल मसाल्यात हानिकारक रंग आणि केमिकल्सची भेसळ करणारे मोठे रॅकेट पकडले आहे. या रॅकेटमुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता.
या कारवाईत इम्रान अहमद (मुस्लिम नगर, धुळे) आणि मोहम्मद असीम (धुळे) या दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, हे दोघे मस्जिद बंदर येथून अत्यंत हानिकारक रंग आणि केमिकल्स आणून त्यांचा वापर लाल मसाल्यात भेसळ करण्यासाठी करत होते. त्यांनी एमआयडीसी परिसरातील भाड्याच्या गाळ्यात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मसाला तयार करण्याचा धंदा चालवला होता. त्यांच्या या धंद्यात ते १२० किलो लाल मसाल्यामध्ये ८ किलो भेसळयुक्त तेल, ४० किलो अत्यंत टॉक्सिक रंग आणि इतर केमिकल्स मिसळत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
तपासात असेही उघडकीस आले आहे की, हा भेसळयुक्त मसाला ११० रुपये प्रति किलो दराने विकला जात होता. यामुळे केवळ आर्थिक फसवणूकच होत नव्हती, तर सामान्य लोकांच्या आरोग्याला देखील गंभीर धोका निर्माण झाला होता. हानिकारक रंग आणि केमिकल्सच्या वापरामुळे या मसाल्याच्या सेवनाने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशा परिस्थितीत पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि या धंद्याचा पर्दाफाश केला.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वत: घटनास्थळी भेट दिली. त्यांनी संपूर्ण कारवाईची पाहणी केली आणि अधिकृत तपासासाठी फ़ूड एंड ड्रग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना बोलावले आहे. पोलिसांनी पकडलेला मुद्देमाल केमिकल अनालिसिससाठी पाठवला जाणार आहे. या अनालिसिसच्या अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.
या कारवाईत एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पवार आणि त्यांच्या पथकाने तपशीलवार माहिती गोळा करून या रॅकेटचा पर्दाफाश केला. मोहाडी एमआयडीसी परिसरातील भाड्याच्या गाळ्यात हा धंदा बिनधास्तपणे चालला होता, आणि पोलिसांनी नेमके तेथेच धडक कारवाई केली.
![]() |
| - Advertisement - |
या कारवाईनंतर जिल्ह्यातील इतर भेसळखोरांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विक्रीमुळे होणारे दुष्परिणाम आणि त्याविरुद्ध कठोर कारवाईमुळे अनेकांनी आपले अनैतिक धंदे बंद करण्यास सुरुवात केली आहे. पोलिस दलाने केलेल्या या धाडसी कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, आणि यामुळे भेसळखोरीला चाप लावण्यासाठी पोलिसांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे.

