धुळे दर्पण न्यूज :-शिरपूर तालुक्यातील शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., शिवाजीनगर दहिवद, ता. शिरपूर, जि. धुळे संचलित माँ रेवा शुगर्स प्रा. लि. यांच्या वतीने शनिवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता ऊस पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शनासह भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना, शिवाजीनगर दहिवद, ता. शिरपूर येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी ऊस उत्पादनवाढीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मार्गदर्शन देण्यासाठी विविध तज्ञांची उपस्थिती असेल. ऊस लागवडीबाबत आधुनिक तंत्रज्ञान, योग्य व्यवस्थापन पद्धती, आणि उत्पादनवाढीचे तंत्र हे या परिसंवादात चर्चिले जाणार आहेत. आडसाली, पूर्व हंगामी व सुरु ऊस लागवडीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये माजी आमदार व धुळे आणि नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे, आमदार काशिराम दादा पावरा, माजी नगराध्यक्ष व प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल, शिरपूर साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव पाटील, उपाध्यक्ष दिलीपभाई पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन माँ रेवा शुगर्स प्रा. लि. चे संस्थापक आणि मार्गदर्शक कैलाशचंदजी गोयल यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच, या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, शिरपूर तालुका राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार गट) अध्यक्ष दिनेश मोरे, शिरपूर तालुका राष्ट्रवादी पक्ष (शरद पवार गट) अध्यक्ष समाधान पाटील, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हा संघटक राजू टेलर, शिवसेना (शिंदे गट) तालुका अध्यक्ष कन्हेया चौधरी, काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष मनोहर पाटील यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक नेते उपस्थित राहणार आहेत.
![]() |
| - Advertisement - |
यावेळी ऊस उत्पादनातील नवीन पद्धतींवर मार्गदर्शन करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथील ऊस शाखेचे तज्ञ सुरेश बी. माने पाटील हे उपस्थित राहणार असून, शेतकऱ्यांना ऊसाच्या लागवडीपासून ते उत्पादनवाढीसाठी वापरायच्या तंत्रज्ञानाबाबत सखोल माहिती देणार आहेत.
या कार्यक्रमात ऊसाशी संबंधित विविध प्रकारचे आधुनिक यंत्रसामग्री, औजारे, ट्रॅक्टर, आणि शेतीसाठी आवश्यक असे स्वयं-चालित उपकरणे यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना उत्पादनवाढीमध्ये मदत करणारे नवीन वाण, ऊसाला बाळभरणी आणि मोठी भरणी करणाऱ्या तंत्रांचा उपयोग याबद्दलही माहिती दिली जाणार आहे. याशिवाय, शासकीय योजनांशी निगडित विविध माहिती देखील या मेळाव्यात उपलब्ध असेल.
शेतकऱ्यांसाठी हा एक सुवर्णसंधी असून, शेतीशी संबंधित विविध नवीन तंत्रज्ञान व ऊस उत्पादनवाढीसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी त्यांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन माँ रेवा शुगर्स प्रा. लि. शिरपूर यांनी केले आहे.

