विधानसभा निवडणुकीसाठी वादग्रस्त वक्तव्यांचे चित्रीकरण करण्याचे निर्देश
धुळे दर्पण न्यूज :- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुका शांततेत आणि निःपक्ष वातावरणात पार पडाव्यात, यासाठी कर्तव्यावर असलेल्या सर्व यंत्रणांनी आपल्या जबाबदाऱ्यांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोकलिंगम यांनी दिले आहेत.
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी निवडणुकीसाठी आवश्यक त्या उपाययोजनांबद्दल चर्चा केली. प्रामुख्याने दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांसाठी विशेष सोयी-सुविधा पुरवण्यावर भर देण्यात आला. मतदान केंद्रांवर पाणी, प्राथमिक आरोग्य सेवा इत्यादींची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
पोलिस प्रशासनाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून गर्दीचे नियोजन करावे, तसेच आंतरराज्य सीमांवरील चेकपोस्टवर रोख रक्कम व बेकायदेशीर मद्यसाठ्यांच्या वाहतुकीवर प्रतिबंधात्मक कारवाईचे सुक्ष्म नियोजन करावे, असेही सांगण्यात आले.
विशेषत: निवडणूक प्रचारसभांमध्ये होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांचे चित्रीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बेताल, प्रक्षोभक, आणि चुकीच्या वक्तव्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करून त्यावर योग्य कारवाई करण्यात यावी, असेही निर्देश दिले गेले आहेत. फेक न्यूजवर नियंत्रण ठेवण्यासाठी सायबर क्राईम शाखेने जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या समन्वयाने तात्काळ पावले उचलावी, असेही एस. चोकलिंगम यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस, आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
.jpg)