धुळे दर्पण न्यूज :- धुळे: मागील काही दिवसांत धुळे शहरात एक विचित्र राजकीय तमाशा पाहायला मिळतोय. गल्ली बोळांमध्ये अचानक वाढलेली बॅनरबाजीची संख्या, मोठमोठ्या दाव्यांसह लटकणारे बॅनर्स, आणि स्थानिक पातळीवर होणारी चेष्टा-टवाळी हा धुळेकरांचा रोजचा नवा अनुभव बनला आहे. हे बॅनर्स लावणारे नेते कोण? सामान्य जनतेला बहुतेकांची नावेही माहिती नाहीत, परंतु अचानक हे चेहरे ‘आमदार’ पदाच्या स्पर्धेत आल्यासारखे दिसू लागलेत. हे नेते प्रत्यक्षात कोणताही राजकीय वारसा नसलेले आणि बहुतेक वेळा समाजात नगण्य स्थान असलेले लोक आहेत, पण बॅनरबाजीच्या माध्यमातून एक उथळ प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.


  धुळेकर जनतेच्या नजरेत या बॅनर्सची संख्या आणि त्यावर दिसणारे चेहरे हास्याचा विषय झाले आहेत. गेल्या काही वर्षांत ज्यांची साधी ओळखदेखील राजकारणात नव्हती, ते अचानक मोठे राजकीय दावे करताना दिसत आहेत. विशेषतः गल्लीछाप नेत्यांकडे अचानक प्रचंड प्रमाणात पैसा येत आहे. त्यांनी सट्टा, मटका, वाळू तस्करी, डांबर, रॉकेल, हातभट्टी अशा बेकायदेशीर धंद्यांतून पैसे कमावले आहेत, ज्यामुळे राजकारणात उडी मारणं त्यांच्यासाठी सहज झालं आहे.


  धुळेतील ही बॅनरबाजी एका अनोख्या राजकीय गणितावर आधारित आहे. गल्लीतल्या गुंडांपासून सुरुवात करणारे हे तथाकथित नेते, गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष होणे, दहीहंडी उत्सवांचे संयोजन करणे, आणि सोसायट्यांच्या अध्यक्षपदांवर विराजमान होणे, अशा साऱ्या माध्यमातून त्यांची "प्रगती" करतात. त्यांना कुठल्याही अधिकृत पदाची गरज नसते, फक्त पैसा आणि लोकांचं लक्ष वेधणारी बॅनरबाजी हवी असते.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

गल्लीतले छपरी नेते आणि त्यांची स्वप्नं

  गल्लीतल्याच मंडळांपासून सुरुवात करणारे हे नेते काहीतरी पद मिळवतात, मग ते सरपंच असो किंवा नगरसेवक. पद एकदा मिळालं की, समाजात स्वतःचं वजन दाखवण्यासाठी बॅनर्सवर दिसणं सुरू होतं. नावापुढे ‘आण्णा’, ‘भाऊ’, ‘बाबा’, ‘तात्या’ अशा उपाध्या लागल्या की, लोक त्यांना ओळखू लागतात. मग गल्लीतील रिकामटेकड्या तरुणांना गोळा करून टोळी तयार होते. आपल्या प्रतिष्ठेची बनावट कथा तयार करून ते गल्लीबोळातील ‘बाहुबली’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण करतात.


  ‘डोळे काढून हातात देईन’, ‘तंगड्या तोडून टाकीन’ अशा प्रकारच्या धमक्या आणि असली भाषणं यांचं राजकारण बनतं. अशा तरुणांना आपल्या टोळीत सामावून घेऊन ते आपल्याला राजकीय शक्ती मिळवून देतात. मग नगरसेवक पद, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यात प्रवेश होतो. अशा प्रकारे एकेक बॅनरबाज नेता हळूहळू पुढे सरकतो.


बॅनरबाजीचा खर्च आणि लोकांच्या भावना

  धुळे शहरात अशा नेत्यांच्या बॅनरबाजीचा खर्चही तितकाच महत्त्वाचा आहे. १० X २० फुटांचे बॅनर्स बनवणं, जागा शोधून त्यावर लावणं, रिक्षांच्या मागे चिटकवणं, यासाठी लाखो रुपये खर्च होतात. साधारण तीन ते पाच हजारांपासून बॅनरचा खर्च सुरू होतो, आणि काही मोठ्या बॅनर्ससाठी तर हा खर्च दहा ते पंधरा हजारांपर्यंतही जातो. हे पैसे कुठून येतात, हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावतोय.


  गुंडगिरीतून कमावलेले आणि बेकायदेशीर धंद्यातून आलेले पैसे या बॅनरबाजीच्या माध्यमातून सहज उधळले जातात. नेत्यांना आपल्या प्रतिष्ठेसाठी हा खर्च काही मोठा वाटत नाही. मात्र धुळेकर जनतेला हे सारे एक प्रकारचा तमाशा वाटतो. काही तरुण तर या बॅनर्सवर थुंकतात, काही फाडून टाकतात, तर काहींच्या मते नेत्यांच्या पात्रतेप्रमाणे त्यावर मुतून ठेवतात.


राजकारणातील खोटी प्रतिष्ठा आणि समाजातील हानी

  धुळे शहरातील राजकीय वातावरणात गल्लीछाप नेत्यांनी समाजाची खिल्ली उडवली आहे. गणपती मंडळं, दहीहंडी, नगरसेवक पदं, सोसायटीच्या अध्यक्षपदांपासून पुढे जाणाऱ्या या नेत्यांच्या राजकारणामुळे सामान्य जनतेला वेगळा अनुभव मिळत आहे. स्थानिक राजकारणात ‘नेता’ म्हणून पुढे येण्यासाठी पैसा, गुंडगिरी, आणि बॅनरबाजी यांवर आधारित हा प्रवास कोणत्याही ठोस समाजसेवेवर आधारित नाही.


  धुळे शहरातील माजी आमदार अनिल गोटे यांनी यावर भाष्य करताना स्पष्ट मत मांडलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, खऱ्या नेत्याला बॅनरबाजीची गरज नसते. जनतेसाठी केलेल्या चांगल्या कामांमुळेच प्रतिष्ठा मिळते, ती पैशाच्या किंवा फक्त बॅनरबाजीच्या जोरावर मिळवता येत नाही. ते म्हणतात, "मी गेली ५०/५५ वर्षे सार्वजनिक जीवनात आहे, पण कधीच मला स्वतःची बॅनरबाजी करावी लागली नाही. कामं बोलतात, बॅनर नव्हे."


  अनिल गोटेंनी या नेत्यांना एक स्पष्ट संदेश दिला आहे: राजकारणात पुढे यायचं असेल, तर लोकांसाठी काम करा, समाजसेवा करा, स्वतःचं कौतुक लोकांना सांगायला वेळ घालवण्याऐवजी तुम्ही केलेल्या कामांची लोकच प्रशंसा करतील.

- Advertisement -