धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील गल्ली नंबर ५ मध्ये असलेल्या चंद्रकांत अँड कंपनी या होलसेल साडी दुकानाला मंगळवारी रात्री अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग एवढ्या झपाट्याने पसरली की, दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील मोठ्या प्रमाणावर असलेला साडीचा माल जळून खाक झाला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.
दुकान मालक चंद्रकांत पिंगळे हे गेल्या अनेक वर्षांपासून सहावारी, नऊवारी पैठणी साड्यांच्या होलसेल व्यवसायात कार्यरत आहेत. या दुकानात महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या पैठणी साड्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी ठेवले जातात. मात्र, मंगळवारी रात्री उशिरा अचानक शॉर्टसर्किटमुळे दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे समजते. आगीची तीव्रता इतकी होती की, बघता बघता ती संपूर्ण मजल्यावर पसरली आणि त्यात लाखों रुपयांचे साडीचे गठ्ठे जळून खाक झाले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
आग लागताच तातडीने धुळे महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाला याबाबत कळविण्यात आले. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचले आणि तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण ठरत होते, परंतु अग्निशामक जवानांनी अथक प्रयत्न केल्याने त्यांनी काही तासांत आग विझवण्यात यश मिळवले. आगीमुळे साडीचा साठा पूर्णतः जळून खाक झाला असला तरी मोठा अनर्थ टळला आहे.
या घटनेमुळे दुकानाचे तिसऱ्या मजल्यावर ठेवलेले लाखों रुपयांचे पैठणी साड्यांचे साठा पूर्णपणे नष्ट झाला आहे. या आगीत झालेल्या मोठ्या नुकसानामुळे पिंगळे कुटुंबाला आर्थिक फटका बसला आहे. धुळे शहरातील व्यापारी वर्गात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. या आगीमुळे व्यवसायिक सुरक्षा आणि इलेक्ट्रिक सिस्टमची देखभाल या मुद्द्यांवरही चर्चा सुरू झाली आहे.
घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाचे अधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. स्थानिकांनीही या आगीची घटना पाहून दुःख व्यक्त केले आणि पिंगळे कुटुंबाच्या आर्थिक भरपाईची मागणी केली आहे.
