धुळे दर्पण न्यूज :- दि. १७: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल यांनी धुळेकर जनतेसाठी विकासाचे वचन देणारा वचननामा रविवारी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केला. या वचननाम्यातून त्यांनी रोजगार, दळणवळण, पर्यटन, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी योजना सादर केल्या आहेत.


  पत्रकार परिषदेला निरीक्षक आमदार मुकेश पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर प्रदीप कर्पे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

विकासाच्या दिशेने महत्त्वाचे उपक्रम


  वचननाम्यातील मुख्य मुद्द्यांमध्ये आयटी पार्कची उभारणी, एमआयडीसीचे विस्तारीकरण, धुळे-नाशिक रेल्वेसेवा सुरू करणे, गोंदूर विमानतळाचा विस्तार आणि श्रीराम सृष्टी उभारण्याच्या योजनांचा समावेश आहे. याशिवाय, धुळेकरांच्या दैनंदिन समस्यांवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि क्रीडाक्षेत्राच्या विकासावर भर दिला आहे.


आयटी पार्क आणि रोजगाराच्या संधी


  धुळे शहरातील तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी आयटी पार्क उभारण्याचे आश्वासन अग्रवाल यांनी दिले आहे. आयटी पार्कमुळे शहरातील तरुणांना आयटी क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध होतील, तसेच परकीय गुंतवणूकही वाढेल.


एमआयडीसीचे विस्तारीकरण


  रावेर गावाजवळील १,००० एकर जमिनीवर एमआयडीसीचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. यामुळे धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील आणि हजारो रोजगार निर्माण होतील.


गोंदूर विमानतळाचा विस्तार


  गोंदूर विमानतळाचा विस्तार करून धुळे-मुंबई आणि धुळे-पुणे यांसारख्या विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. या सेवेच्या माध्यमातून धुळे शहराच्या विकासाला चालना मिळेल आणि शहर पर्यटन व व्यावसायिक दृष्टिकोनातून विकसित होईल.


धुळे-नाशिक रेल्वेसेवा


  धुळे-नाशिक मिनी रेल्वेसेवा सुरू करण्याचे वचनही अग्रवाल यांनी दिले आहे. या रेल्वेमार्गामुळे दळणवळण सुलभ होईल आणि धुळे जिल्ह्याचा इतर शहरांशी संपर्क अधिक सशक्त होईल.


भव्य श्रीराम सृष्टीचे स्वप्न


  भगवान श्रीरामांच्या दिव्य जीवनाचे दर्शन घडवणारी ४२ एकर क्षेत्रात भव्य श्रीराम सृष्टी उभारण्याचा प्रस्ताव अग्रवाल यांनी मांडला आहे. ही श्रीराम सृष्टी धार्मिक पर्यटनाचे मोठे केंद्र बनणार असून त्यामुळे शहरात रोजगाराच्या संधी आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल.


पायाभूत सुविधा आणि इतर विकास योजना


  एक दिवसाआड पाणीपुरवठा: धुळे शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय म्हणून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची हमी देण्यात आली आहे.


  पांझरा नदीचा विकास: पांझरा नदीचे सुशोभीकरण आणि आसपासच्या भागाचा विकास करून पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्याची योजना आहे.


  डिजिटल लायब्ररी: विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लायब्ररी उभारून आधुनिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे वचन दिले आहे.


  कृषी विद्यापीठासाठी पाठपुरावा: जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.


  मिनी क्रीडा संकुल: युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध भागांत मिनी क्रीडा संकुले उभारण्याची घोषणा केली आहे.



"हिंदुत्वाची कास, विकासाचा ध्यास" – अग्रवाल यांचा मंत्र


  पत्रकार परिषदेत बोलताना अनुप अग्रवाल म्हणाले, "धुळे हे खान्देशातील एक महत्त्वाचे शहर असून, त्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. मी हिंदुत्वाची कास आणि विकासाचा ध्यास घेतला आहे. धुळेकर जनतेने मला एक संधी दिल्यास मी या शहराचा विकासासाठी संपूर्ण प्रयत्न करीन."


वचननामा म्हणजे विकासाचे वचन


  भाजप महायुतीचा हा वचननामा म्हणजे विकासाची दिशा देणारे दस्तऐवज आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले. “धुळे शहराच्या विकासासाठी आणि धुळेकर जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी मला मतदान करून विजयी करा,” असे आवाहन त्यांनी शेवटी केले.


जनतेतून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा


  महायुतीच्या या वचननाम्यामुळे धुळेकर जनतेत मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. आता जनतेने या वचननाम्यातील विकासाच्या आश्वासनांवर विश्वास दाखवून मतदान करावे, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.