Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
पत्रकार परिषदेत अनिल गोटेंची भूमिका
शहरातील कल्याण भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत अनिल गोटे यांनी ईव्हीएमच्या माध्यमातून जनतेच्या मतांचा अपमान झाल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, "गेल्या अनेक महिन्यांपासून विविध पक्ष, सर्व्हे कंपन्या आणि वृत्तवाहिन्यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये धुळेकरांनी माझ्या नावाला प्रचंड पसंती दिली होती. निवडणुकीआधीच्या अंदाजानुसार मला ५० ते ५१ टक्के मते मिळतील, असा अंदाज होता. पण निकालानंतर मला फक्त २४,००० मते मिळाली, जी पूर्णपणे अनाकलनीय आहे. ही हेराफेरी नाही तर काय?"
मतदानातील संशयास्पद वाढ
गोटेंनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले. "२० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता मतदानाचा टक्का ५८ टक्के होता. रात्री ११.३० वाजता तो ६५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आणि दुसऱ्या दिवशी ६६ टक्के झाला. या ७.८३ टक्के वाढलेल्या मतदानाचे कुठलेही पुरावे किंवा रेकॉर्ड नाहीत," असे सांगत त्यांनी ईव्हीएम हेराफेरीच्या संशयाला वाचा फोडली.
भाजपच्या उमेदवारासाठी हेराफेरीचा दावा
अनिल गोटेंनी सांगितले की, "भाजप उमेदवार अनुप अग्रवाल यांना सर्व्हेमध्ये फक्त ५-६ टक्के लोकांनी पसंती दिली होती. मात्र, ईव्हीएम हेराफेरी करून त्यांना निवडून आणण्यात आले. हे जनतेच्या मतांवर दरोडा आहे. निवडणूक आयोग जनतेऐवजी स्वतः प्रतिनिधी ठरवत आहे."
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
मराठा व मुस्लिम समाजाचा पाठिंबा
अनिल गोटेंनी स्पष्ट केले की, "मराठा समाज भाजपच्या विरोधात होता. माजी आमदार फारुक शहा यांच्या कार्यपद्धतीवर नाराज मुस्लिम समाजही माझ्या पाठीशी होता. या निवडणुकीत माझ्या बाजूने जनतेचा स्पष्ट कौल होता, मात्र ईव्हीएमने तो वळवण्यात आला."
ईव्हीएमच्या जागी बॅलेटची मागणी
गोटेंनी ईव्हीएम प्रणालीवर पूर्णपणे बंदी घालून पारंपरिक बॅलेट पेपर प्रणालीचा अवलंब करण्याची मागणी केली आहे. "ईव्हीएममधील हेराफेरीमुळे लोकशाही धोक्यात आली आहे. महाराष्ट्रातून 'ईव्हीएम बंद'ची चळवळ उभारण्याची गरज आहे," असे ते म्हणाले.
९ डिसेंबरचा 'मशाल मोर्चा'
गोटेंनी ९ डिसेंबर रोजी धुळ्यात विशाल 'मशाल मोर्चा' काढण्याचे जाहीर केले आहे. या मोर्चातून ईव्हीएम विरोधात आंदोलन उभे करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. "नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे. ही चळवळ धुळेकरांनी हाती घेतली पाहिजे," असे आवाहन गोटेंनी केले.
उपस्थित मान्यवर
या पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी महापौर भगवान बापूजी करनकाळ, नरेंद्र परदेशी, धिरज पाटील, अविनाश लोकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जनतेचा संतप्त सवाल – 'मते गेली कुठे?'
गेल्या आठवडाभरापासून धुळेकर नागरिक ईव्हीएम प्रणालीविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत. "आमची मते गेली कुठे?" असा संतप्त सवाल नागरिक करत असून ९ डिसेंबरचा 'मशाल मोर्चा' लोकशाही वाचवण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
– धुळे दर्पण –
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
