धुळे दर्पण न्यूज :-उद्या शनिवार, दिनांक २३ रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा प्रशासनाने त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात येणार असून, कोणालाही बिनधास्त प्रवेशाची परवानगी दिली जाणार नाही. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह साहित्य मतमोजणी केंद्रांवर आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. विजयी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी मिरवणूक काढण्यास देखील बंदी असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जाहीर केले आहे.
मतमोजणीसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था
धुळे शहरातील नगावबारी परिसरातील केंद्रीय विद्यालयात मतमोजणी केंद्र असून, तिथे त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
1. पहिल्या टप्प्यात: सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली पॅरामिलिटरी फोर्सचे जवान तैनात असतील.
2. दुसऱ्या टप्प्यात: एसआरपीएफचे जवान तैनात राहतील.
3. तिसऱ्या टप्प्यात: स्थानिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित असतील.
प्रवेशासाठी फक्त अधिकृत पासधारकांना परवानगी असून, त्यांची कसून तपासणी केली जाईल. मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू केंद्रात घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन
पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले की, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उमेदवारांच्या निवासस्थानांच्या परिसरातही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतरही कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका, घोषणा, किंवा भावना दुखावणाऱ्या कृतींवर तातडीने कारवाई होईल.
मिरवणुकीस सक्त बंदी
विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी विजय मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी या आदेशाचे उल्लंघन केले, तर त्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक धिवरे यांनी केले आहे.
प्रशासनाची तयारी पूर्ण
मतमोजणीच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली असून, उद्या जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांचे निकाल जाहीर होतील. मतमोजणी प्रक्रियेस कोणत्याही अडथळ्याविना सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
