दोंडाईचा प्रतिनिधी: रईस शेख


     धुळे दर्पण न्यूज :-  दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा आपली चपळता आणि दक्षता सिद्ध करत अक्कलकोस येथे झालेल्या जबरी चोरी प्रकरणाचा फड २४ तासांच्या आत उघडकीस आणला आहे. या कामगिरीमुळे पोलिसांची कार्यक्षमता अधोरेखित झाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास वाढीस लागला आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

गुन्ह्याची हकीगत

     दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजी रिसनगाव (ता. लोहा, जि. नांदेड) येथील मंदीर बांधकाम करणारे मिस्त्री, दिगंबर पवार (वय ३४) आणि त्यांचे सहकारी गंगाधर पऊळ हे अक्कलकोस येथून २.५ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन मालपुर मार्गे प्रवास करत होते. रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास, दोन दुचाकींवरून आलेल्या चार चोरट्यांनी त्यांच्या मोटारसायकली अडवून, चाकूचा धाक दाखवून धमकावत लुटमार केली.


फिर्यादी दिगंबर पवार यांनी प्रसंगावधान राखत पळ काढल्याने रोख रक्कम सुरक्षित राहिली, मात्र चोरट्यांनी त्यांचे मोबाईल फोन, पॉवर बँक तसेच गंगाधर पऊळ यांची मोटारसायकल (MH-26-CF-6995) जबरीने हिसकावून पळ काढला.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

पोलिसांची जलद कार्यवाही

    गुन्हा दाखल होताच, धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी त्यांच्या पथकाला जलदगतीने तपास करण्याचे आदेश दिले.

    सपोनि दिगंबर शिंपी, पोहेको रविंद्र गिरासे, हिरालाल सुर्यवंशी, महेश शिंदे, प्रविण निकुंभे, तुषार पवार, सौरभ बागुल आणि होमगार्ड अमीन शहा यांनी रात्रंदिवस परिश्रम घेऊन आरोपींचा मागोवा घेतला. यामध्ये शुभम ऊर्फ बंटी अनिल भोई (वय १९) आणि राकेश संजय कोळी (वय २६, रा. डाबरी घरकुल, दोंडाईचा) यांना पकडण्यात आले.

- Advertisement -


मुद्देमाल जप्त

    गुन्ह्याच्या तपासादरम्यान, चोरीस गेलेली मोटारसायकल, मोबाईल फोन आणि पॉवर बँक असा सगळा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या साथीदारांची नावेही निष्पन्न झाली आहेत. पोलिसांना आणखी काही गुन्हे उघडकीस आणण्याचा विश्वास आहे.


स्थानिकांची प्रतिक्रिया

     दोंडाईचा पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि कार्यक्षमतेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे. त्यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करत, अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


पोलिसांचे आवाहन

   सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागाने नागरिकांना कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा घटना दिसल्यास तातडीने कळवण्याचे आवाहन केले आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम