धुळे दर्पण न्यूज :- महामानव, घटनाकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या पोटात असलेला द्वेष आज अमित शहा यांच्या ओठातून बाहेर पडल्याचा आरोप शिवसेनेचे नेते, माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी केला आहे.
लोकसभेत अमित शहा यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. "विरोधी पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव इतक्या वेळा घेतात की त्यांनी परमेश्वराचे नाव घेतले असते, तर सात जन्म स्वर्गात गेले असते," असे वक्तव्य अमित शहा यांनी केले. यामुळे देशभरातील आंबेडकर अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली असून, हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
अनिल गोटे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील भाजपाचा दृष्टीकोन लपून राहिला नाही. अमित शहा यांनी त्यांच्या वक्तव्याने हे सिद्ध केले आहे की भाजपाच्या अंतःकरणात आंबेडकरांविषयी द्वेष आणि असहिष्णुता आहे. शिवसेनेने याचा तीव्र निषेध नोंदवला आहे."
परभणी आणि बीड जिल्ह्यातील गुंडगिरीवर शिवसेनेचा हल्लाबोल
"परभणी असो किंवा बीड, महाराष्ट्राला लागली गुंडगिरीची कीड!" अशा घोषणा देत धुळे येथे आज सायंकाळी सात वाजता कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले. या मार्चची सुरुवात परमवीर चक्र विजेते अब्दुल हमीद यांच्या स्मारकापासून झाली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत उत्स्फूर्ततेने पूर्ण झाली.
परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू आणि बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. गोटे यांनी या घटनांवर बोलताना म्हटले की, "हे सरकार आता विरोधकांना संपवण्यासाठी 'देवेंद्र पॅटर्न' राबवत आहे. निष्पाप नागरिकांना तुरुंगात टाकून तेथेच त्यांना पोलीस यंत्रणेच्या मदतीने मारून टाकण्याचा नवा पद्धतीचा राजकीय दहशतवाद भाजपाकडून सुरू झाला आहे."
गुन्हेगारी विरोधात 'जशास तसे' उत्तर देण्याचा निर्धार
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
कॅन्डल मार्च दरम्यान शिवसेना कार्यकर्त्यांनी अन्याय, गुंडगिरी आणि भाजपाच्या दडपशाही विरोधात 'जशास तसे' उत्तर देण्याचा निर्धार घेतला. "आता आम्ही या अन्यायाविरुद्ध लढा देणार आहोत. गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि दडपशाहीच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरेल," असा इशारा अनिल गोटे यांनी दिला.
कॅन्डल मार्चमध्ये प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या कॅन्डल मार्चमध्ये माजी आमदार शरद पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपनेत्या शुभांगी पाटील, महानगर प्रमुख धीरज पाटील यांसह अनेक प्रमुख नेत्यांनी सहभाग घेतला. शिवाय, शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.
![]() |
| - Advertisement - |
– धुळे दर्पण –
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम


