धुळे दर्पण न्यूज :- धुळे जिल्हा उद्योग केंद्रातील खादी ग्रामोद्योग प्रभारी अधिकारी विजय चाटे यांच्या वागणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाटे हे आज दारूच्या नशेत कार्यालयात आले होते, ही बाब शिंदे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी त्वरीत कार्यालय गाठून संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला. चाटे यांची खरडपट्टी काढून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
"माझं कोणी काही करू शकत नाही" - अधिकाऱ्याची धमकी
विजय चाटे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नातेवाईक असल्याचा दावा केला. "माझं कोणी काही करू शकत नाही," अशी धमकी त्यांनी दिली. मात्र, या धमकीला न जुमानता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याची दारूच्या नशेतली स्थिती पाहून पोलिसांना पाचारण केले.
नशेच्या आहारी गेलेला अधिकारी, कार्यालयात अस्वच्छता
गेल्या काही दिवसांपासून चाटे हे दारूच्या नशेत कार्यालयात येत असल्याच्या तक्रारी होत्या. आजच्या घटनेत ते कार्यालयात धुम्रपान करताना आढळले. त्यांच्या वर्तणुकीमुळे कार्यालय परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी निर्माण झाली होती. शिवाय, त्यांनी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाल्याचा वापर केल्याचेही निदर्शनास आले.
बेरोजगारांचे काम ठप्प
धुळे जिल्हा उद्योग केंद्र हे अनेक बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी शोधण्याचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, प्रभारी अधिकारीच नशेत राहून कामकाज करत असल्याने नागरिकांचे काम ठप्प होत असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून होत्या. "जर अधिकारी स्वतःच जबाबदारी सोडून दारू पिऊन काम करत असतील, तर हे आम्ही सहन करणार नाही," असे शिंदे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
कारवाईची मागणी
या घटनेनंतर शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन या अधिकाऱ्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे जिल्ह्याच्या कामकाजावर विपरित परिणाम होतो आहे, याची गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.
संबंधित अधिकाऱ्यावर होणार कठोर कारवाई?
या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विजय चाटे यांच्यावर योग्य ती कारवाई होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने या प्रकरणात तत्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करावे, अशी जनतेचीही मागणी आहे.
– धुळे दर्पण –
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


