Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार रामदादा भदाणे यांनी शुक्रवारी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
विभागीय पाहणी आणि रुग्णसंवाद
आ. भदाणे यांनी जनरल वॉर्ड, अतिदक्षता विभाग, अपघात विभाग, सर्जिकल ओटी, प्रसूती विभाग यांसारख्या महत्त्वाच्या विभागांना भेट देऊन दाखल रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांना उपचारादरम्यान कोणत्या समस्या येतात, त्यांना पुरेशा सुविधा आणि दर्जेदार सेवा मिळत आहेत का, याची माहिती त्यांनी घेतली. यावेळी रुग्णालय प्रशासनाला नियमित स्वच्छता, दर्जेदार सेवा आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
अधिष्ठातांसोबत बैठक
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित पाठक, प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत कुमावत आदींसह विविध विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीत रुग्णालयातील समस्यांवर चर्चा करण्यात आली. महाविद्यालयाला आवश्यक अतिरिक्त मनुष्यबळ, बंद असलेले सीटी स्कॅन यंत्र, नवीन एमआरआय सेंटर उभारणी याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना आ. भदाणे यांनी दिल्या.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
प्रमुख मागण्यांचा पाठपुरावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्रालयाकडे या मागण्यांचा पाठपुरावा करून आवश्यक निधी मिळवून रुग्णालयाच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन आ. भदाणे यांनी दिले.
परिचारिकांशी संवाद
आ. भदाणे यांनी नर्सिंग कॉलेजला भेट देत महाविद्यालय आणि रुग्णालयातील परिचारिकांशी संवाद साधला. परिचारिकांनी आपल्या समस्या आणि मागण्या मांडल्या, यावर सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या भेटीदरम्यान भाजपचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब गदाणे, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद जाधव, जिल्हा संघटन सरचिटणीस किशोर सिधवी, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाणे, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील, पंचायत समिती सदस्य सखाराम पाटील, शरद पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
![]() |
| - Advertisement - |
आ. रामदादा भदाणे यांच्या या दौऱ्यामुळे भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आवश्यक सुविधा लवकरच कार्यान्वित होण्याची आशा निर्माण झाली आहे.


