धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरात स्वच्छता आणि शिस्त प्रस्थापित करण्यासाठी, तसेच विकासाला चालना देण्यासाठी नवनिर्वाचित आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांनी महापालिकेच्या पहिल्या बैठकीत विविध ठोस उपाययोजना आणि सूचना दिल्या. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मनपा प्रशासनाला वेळोवेळी मार्गदर्शन करतानाच नागपूर अधिवेशनात वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचा प्रश्न प्रखरपणे मांडण्याचा निर्धार व्यक्त केला.
शहर स्वच्छतेसाठी ठोस उपाययोजना
आमदार अग्रवाल यांनी शहर स्वच्छतेवर विशेष भर देत, प्रत्येक प्रभागासाठी सफाई कामगारांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले. कामगारांवर देखरेखीसाठी निरीक्षक नेमून त्यांच्या कार्यक्षमतेवर लक्ष ठेवण्याची सूचना केली. सफाई विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कामगारांपर्यंत प्रत्येकाला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत अनुपस्थितीबाबत कठोर कारवाईचा इशारा दिला.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
घंटागाड्या दुरुस्त करा किंवा नव्या खरेदी करा:
शहरात सध्या ७९ घंटागाड्या असून त्यापैकी बहुतांश नादुरुस्त आहेत. त्या तातडीने दुरुस्त कराव्यात किंवा लिलावातून जमा झालेल्या निधीतून नव्या गाड्या खरेदी कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली.
क्यूआर कोडचा वापर:
प्रत्येक घरावर लावलेल्या क्यूआर कोडच्या माध्यमातून नागरिकांना थेट तक्रारी नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी केली.
![]() |
| - Advertisement - |
अतिक्रमण हटवण्यासाठी कठोर पावले
शंभरफुटी आणि ऐंशीफुटी रस्त्यांवरील पत्र्याच्या शेड्सवर कर लावावा आणि रस्ते मोकळे करावेत, असे निर्देश देताना आमदारांनी बारापत्थर भागातील गॅरेज व्यावसायिकांना पाण्याच्या टाकीजवळ जागा उपलब्ध करून देण्याचे सुचवले. यामुळे वाहतुकीसाठी रस्ते मोकळे होतील, असे त्यांनी नमूद केले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचा लेखाजोखा घेणार
शहरातील वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचा तपशील मागवून नागपूर अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यामध्ये महापालिकेच्या नावे असलेल्या जमिनी वक्फ बोर्डाच्या नावे केल्याचा प्रकार उघड करत त्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे सुशोभिकरण
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी मंजूर झालेल्या दीड कोटींच्या निधीचा वापर करून स्मारकाचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले.
घरपट्टीत सुधारणा आणि शाळांचे पुनर्विकसन
अनावश्यक घरपट्टी कमी करून उत्पन्न वाढवण्याचा मार्ग त्यांनी सुचवला. जुन्या मालमत्तांना करात सवलत देण्याच्या सूचनाही दिल्या.
महापालिकेच्या शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी त्या शाळांच्या इमारतींमध्ये व्यापारी संकुल विकसित करून वरच्या मजल्यांवर शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला.
![]() |
| - Advertisement - |
इतर महत्त्वपूर्ण सूचना
तिरंगा चौकाचे सुशोभीकरण: तिरंगा चौकाचे नाव साजेसे सुशोभीकरण करण्याचे निर्देश दिले.
अवैध कत्तलखान्यांवर कारवाई: अवैध कत्तलखान्यांवर कठोर कारवाईसाठी स्वतंत्र पथके स्थापन करण्याचे आदेश दिले.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त: रस्त्यांवरील मोकाट जनावरांचे व्यवस्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
शहर विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
धुळेकरांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देताना सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करून धुळे शहराला शिस्तबद्ध आणि स्वच्छ बनवण्याच्या दिशेने पाऊल उचलावे, असे आवाहन आमदार अनुप अग्रवाल यांनी केले.
![]() |
| - Advertisement - |
– धुळे दर्पण –
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम



