डॉ. माधुरी बोरसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साकडे

  धुळे दर्पण न्यूज :- शहरातील वाढती बेरोजगारी, गुंडगिरी, आणि जातीय दंगली यामुळे धुळे शहराला मोठ्या उद्योग-व्यवसायांची नितांत गरज आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपच्या राज्य कार्यसमिती सदस्या व कॅन्सर सर्जन डॉ. माधुरी बोरसे यांनी धुळे शहराचा इलेक्ट्रॉनिक इकोसिस्टिममध्ये समावेश करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  डॉ. बोरसे यांनी मुंबईत ७ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन धुळे शहरातील बेरोजगारी आणि तिच्या दुष्परिणामांचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, "बेरोजगारीमुळे तरुण वर्ग अवैध व्यवसायाकडे वळत असून, त्यातून गुंडगिरी आणि जातीय संघर्षाला खतपाणी मिळते. धुळे शहराच्या इतिहासात जातीय दंगली वारंवार घडल्याचे दिसून आले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी रोजगारनिर्मिती हा एकमेव पर्याय आहे."


इलेक्ट्रॉनिक हबसाठी धुळेची मागणी

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याला २००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा व ५००० प्रत्यक्ष रोजगार निर्मितीचा इलेक्ट्रॉनिक हब मंजूर झाला आहे. या हबमुळे अप्रत्यक्षरीत्या तब्बल ५०,००० रोजगार उपलब्ध होणार आहेत. अशा परिस्थितीत, धुळे शहराचा प्रथम टप्प्यात समावेश करून रोजगारनिर्मितीची संधी देण्याची गरज असल्याचे डॉ. बोरसे यांनी नमूद केले.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचे काम गतीमान करावे

  धुळे जिल्हा हा दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा भाग आहे. मात्र, यासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेत विलंब होत असल्यामुळे या प्रकल्पाला अद्याप पूर्णत्वास नेता आलेले नाही. डॉ. बोरसे यांनी या संदर्भात विशेष भूमी अधिग्रहण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी केली.


धुळेकरांसाठी रोजगारनिर्मितीची गरज

  धुळे जिल्ह्याचा मानवी विकास निर्देशांक राज्यात सर्वांत कमी आहे. औद्योगिक व व्यवसायिक संधींच्या अभावामुळे जिल्ह्यातील तरुणाईचे भविष्य धोक्यात आहे. बेरोजगारीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असून, समाजामध्ये अस्थिरता वाढत आहे. रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून धुळेकरांना या समस्यांमधून मुक्त करण्याची गरज असल्याचे डॉ. बोरसे यांनी अधोरेखित केले.

- Advertisement -
  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्वरित निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. धुळेकरांच्या भविष्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरेल.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम