धुळे दर्पण न्यूज :-  संतुलित शारीरिक व्यायाम व फिटनेसविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने फिट इंडिया मिशन व शासकीय कार्यालये, स्वायत्त संस्था, पीएसयुएस यांच्या सहकार्याने ‘संडे ऑन सायकल’ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली रविवार, २ मार्च २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता जिल्हा क्रीडा संकुल, वाडीभोकर रोड, धुळे येथून सुरू होणार आहे.


शासकीय अधिकारी, युवक-युवतींना सहभागाचे आवाहन

  या रॅलीत शासकीय व निमशासकीय कर्मचारी, युवक-युवती तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

- Advertisement -
  केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा, श्रम व रोजगार मंत्र्यांनी १७ डिसेंबर २०२० रोजी फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह चे उद्घाटन केले होते. तेव्हापासून ही मोहीम ‘संडे ऑन सायकल’ या नियमित उपक्रमाच्या स्वरूपात देशभर चालवली जात आहे. आतापर्यंत देशभरातील १८०० हून अधिक ठिकाणी सुमारे २ लाख सायकलस्वारांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.


प्रधानमंत्रींच्या ‘मन की बात’ मध्ये विशेष उल्लेख

  या मोहिमेचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’च्या ११७व्या भागात केला होता. फिटनेस आणि आरोग्य संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत, नियमित शारीरिक हालचालींमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले होते.


धुळे रॅलीचा मार्ग

  धुळ्यातील ‘संडे ऑन सायकल’ रॅली जिल्हा क्रीडा संकुल, धुळे येथून सुरू होईल आणि गोंदूर विमानतळाजवळ समाप्त होईल. या उपक्रमाद्वारे ‘फिटनेस का डोस, आधा घंटा रोज’ हे घोषवाक्य प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

- Advertisement -
नोंदणी व सहभाग प्रमाणपत्र

  या रॅलीत सहभागी होण्यासाठी फिट इंडिया पोर्टलवर (https://fitindia.gov.in/fit-india-cycling-drive) नोंदणी करावी. कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर सहभागी नागरिकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.


  जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या आरोग्यवर्धक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी केले आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम