धुळे दर्पण न्यूज :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यात १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या अंतर्गत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यात आजपासून पुढील १०० दिवस सकाळी ९ वाजता ‘शुभ मिटिंग’च्या माध्यमातून ई-ग्राम संवाद कार्यक्रम राबवला जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत, तालुका आणि जिल्हास्तरीय सर्व संबंधित अधिकारी एकत्र येऊन नागरिक आणि प्रशासन यांच्यात संवाद साधणार आहेत. गावातील मूलभूत समस्या, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचे १५ दिवसांत निराकरण करण्याचा उद्देश या संवादातून आहे.
या अभिनव संकल्पनेची सुरुवात आज धुळे तालुक्यातील सोनगीर, वहगाव, भिरहाणे, नंदाने आणि गोंदूर ग्रामपंचायत कार्यालयांतून झाली. दूरसंचार प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या ई-ग्रामसंवाद कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाजे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, संजय बागडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोटके, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या कार्यक्रमात सहभागी ग्रामपंचायतींशी थेट संवाद साधला. त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी व ग्रामीण), जलजीवन मिशन, स्वामित्व योजना, आयुष्यमान भारत योजना, ब्रीस्टॅग शेतकरी आयडी, शाळा इमारत बांधकाम, स्मशानभूमी विकास, कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
ग्रामपंचायतींना दिलेल्या सूचनांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांना जागा उपलब्ध नसल्यास संबंधित ग्रामपंचायतींनी त्यासाठी योग्य भूखंड निश्चित करून पंचायत समितीमार्फत प्रस्ताव तहसीलदार कार्यालयाकडे सादर करावा. ज्या गावात स्मशानभूमी नाही, तेथील ग्रामपंचायतींनी जागा निवडून प्रस्ताव सादर करावा आणि पुरेशा झाडांची व पाण्याची व्यवस्था करावी. जलजीवन मिशन योजनेतील विहिरींचे काम पूर्ण झाल्यास तत्काळ पाईपलाइन टाकून पाणीपुरवठा सुरू करावा.
गावातील पाणंद रस्त्यांच्या दुरुस्तीला गती देण्याच्या सूचना देताना, ग्रामस्थांना आयुष्यमान भारत योजना, रेशनकार्ड, आधारकार्ड यांसारख्या सेवांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. गावातील शाळा व अंगणवाडीमध्ये स्वच्छतागृहांची सुविधा असावी आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी विशेष लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींच्या प्रलंबित समस्यांसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेण्याचे निर्देश दिले. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत पातळीवरील अधिकारी यांनी त्यांच्या अधिकारात येणाऱ्या विषयांवर तातडीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत ई-ग्राम संवादाच्या पहिल्या सत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी याचा लाभ घेत आपापल्या गावातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

