![]() |
| "न्यायासाठी एकवटले अन्यायग्रस्त – जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर" |
धुळे दर्पण न्यूज :- धुळे जिल्ह्यात मोबाईल घोटाळ्याचे मोठे प्रकरण समोर आले असून यात गोरगरीब नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घोटाळ्यात बजाज फायनान्सच्या प्रतिनिधींनी मोठी भूमिका बजावल्याचे निदर्शनास आले असून, या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील सहआरोपी करावे, अशी मागणी अन्यायग्रस्त नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या प्रकरणात अनेक कष्टकरी, श्रमिक आणि अल्पशिक्षित नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. कर्जाच्या हप्त्यांच्या ओझ्याखाली दबलेल्या या पीडितांनी न्याय मिळावा, यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. या वेळी ज्येष्ठ नेते हिरामण गवळी, सामाजिक कार्यकर्ते अतुल पाटील यांच्यासह शेकडो फसवणूकग्रस्त नागरिक उपस्थित होते.
मोबाईल घोटाळ्याचा प्रकार
धुळे शहरातील काही मोबाईल विक्रेत्यांनी बजाज फायनान्सच्या प्रतिनिधींसह संगनमत करून अनेक नागरिकांच्या नावावर लाखोंचे कर्ज घेतले. या सगळ्या व्यवहारात संबंधित व्यक्तींच्या परस्पर संमतीशिवाय ओटीपी वापरण्यात आले आणि बनावट दस्तऐवजांच्या आधारे मोठ्या प्रमाणावर मोबाईल खरेदी करण्यात आली.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
सामान्य नियमांनुसार, बजाज फायनान्सकडून कर्ज मंजूर करताना ग्राहकांचा सिबिल स्कोअर तपासला जातो. तसेच, एकाच व्यक्तीला एका दिवसात एकच मोबाईल वितरित करता येतो. परंतु, या घोटाळ्यात एका व्यक्तीच्या नावावर एकाच दिवशी तीन मोबाईल्स घेतल्याचे आढळून आले आहे. काही प्रकरणांमध्ये तब्बल १,२५,००० रुपयांचे मोबाईल एका व्यक्तीच्या नावावर घेतले गेले. यावरून स्पष्ट होते की, बजाज फायनान्सचे अधिकारी आणि काही मोबाईल विक्रेते हे संगनमताने हे गैरव्यवहार करत होते.
फसवणुकीत बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग?
फसवणूक झालेल्या नागरिकांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, बजाज फायनान्सचे अधिकाऱ्यांनी त्यांच्या विश्वासाला तडा दिला आहे. अनेकांना कर्ज योजना आणि रोख परताव्याच्या आमिषाने ओटीपी मागून त्यांच्याच नावावर मोबाईल फायनान्स केले गेले.
![]() |
| - Advertisement - |
बजाज फायनान्सच्या धुळे जिल्हा प्रमुखांसह, सेल्स ऑफिसर आणि अन्य अधिकाऱ्यांनी या गुन्ह्यात भूमिका बजावली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
सिबिल स्कोअर बिघडल्याने भविष्य धोक्यात
या घोटाळ्यामुळे फसवणूक झालेल्या नागरिकांचे सिबिल स्कोअर खराब झाले आहे. भविष्यात बँक किंवा कोणतीही फायनान्स कंपनी त्यांना कर्ज देणार नाही. त्यामुळे अनेक कष्टकरी लोकांचे आर्थिक भविष्य अंधारात गेले आहे.
फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिस प्रशासनाने यामध्ये तातडीने लक्ष घालावे आणि सर्व मोबाईल्स ट्रॅक करून मूळ ग्राहक किंवा दुकानदारांकडून ते परत जमा करून हा तिढा सोडवावा, अशी मागणी केली आहे.
पिडितांचा एकजुटीत लढा
या संपूर्ण प्रकरणात अन्यायग्रस्त नागरिकांनी एकजूट दाखवत आपल्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार केला आहे. या घटनेत पीडित ठरलेल्या काही प्रमुख नागरिकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
राजेश बाळासाहेब गायकवाड, कल्पेश राजेश गायकवाड, अविनाश बाळासाहेब गायकवाड, मोनिका ईश्वर दरेकर, कल्पना संतोष गोंधळी, निलेश बापू अमृतकर, गणेश किसन रासकर, जगदीश पोपट रगडे, मंदाकिनी सुरेश रासकर, भटू बाळू खळदकर, गणेश छोटू बोराडे, संतोष राजेंद्र मेहेत्रे, अंकुश शिवदास चौधरी, रविंद्र गोविंद चव्हाण, माधुरी गजानन खराडे, जितेंद्र उर्फ जितू रावण महाले, राजू शिवाजी पाटील, दुर्गा शिवदास सुर्यवंशी, गोरख भाऊराव चव्हाण, प्रकाश शिवदास सुर्यवंशी, शाना हरी बागले, चुडामण खंडू भराडी, संतोष राजाराम भोपे, विष्णू दत्तात्रय कुरे, अनिता संदिप रासकर, ज्ञानेश्वर प्रकाश रगडे, गणेश लिंगायत आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून आपली कैफियत मांडली.
पेपर विक्रेत्याला धमकीचा प्रकार उजेडात
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. राजू शिवाजी पाटील या पेपर विक्रेत्याने आरोप केला आहे की, "गोल्डन शॉप"चा मालक गिरीष आहुजा याने त्याला धमकी दिली आहे.
राजू पाटील यांनी सांगितले की, "मी गिरीष आहुजाकडे माझ्या नावावर झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी केली. त्याला विचारले की, माझ्या नावावर कर्ज घेतले आहे, मी ते कसे फेडणार? त्यावर त्याने उर्मट उत्तर देत, 'आमचं काहीही होणार नाही, आम्ही अटकपूर्व जामीन घेऊ, तुम्ही तुमच्या रस्त्याने जा,' असे म्हणत धमकी दिली."
पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पिडीत नागरिकांनी आवाज उठवला आहे.
धुळे जिल्ह्यात झालेल्या या आर्थिक घोटाळ्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. प्रशासन आणि पोलिसांनी यावर लवकरात लवकर ठोस पावले उचलली नाहीत, तर याचा मोठा जनआंदोलनात परिवर्तित होण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
– सैय्यद सानिल, धुळे दर्पण
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


