धुळे दर्पण न्यूज :-  दि.२१ - खेळात ध्येय गाठण्यासाठी मेहनत घ्या, यश मिळविण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. आपण जे करतो ते शेवटचे नाही; सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे. सरावावर लक्ष केंद्रित केल्यास प्रत्येक वेळी नवीन काहीतरी मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे मत ब्रिटनच्या नॉर्दर्न आयर्लंडमधील बेलफास्ट शहरातील प्रसिद्ध फ्रिस्टाईल फुटबॉलपटू जिमी नाईट यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.


  पोद्दार इंटरनॅशनल स्कुलमध्ये फ्रिस्टाईल फुटबॉलपटू जिमी नाईट यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील खेळाडूंसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बेलफास्ट येथून विविध ठिकाणी जिमी नाईट यांच्यासारखी पाच विविध क्षेत्रातील पारंगत व्यक्तिमत्त्वे कार्यशाळा घेत असतात. त्यापैकी जिमी नाईट हे पारंपरिक फुटबॉलचे प्रशिक्षण न देता फ्रिस्टाईल फुटबॉलच्या कार्यशाळेतून खेळाडू घडविण्याचे कार्य करत आहेत. महाराष्ट्रातील पोद्दार इंटरनॅशनल स्कुलच्या विविध शाखांमध्ये जाऊन ते फुटबॉल प्रशिक्षणाच्या कार्यशाळा घेत आहेत. आतापर्यंत ५५ शाखांमध्ये कार्यशाळांच्या माध्यमातून फुटबॉलचे धडे विद्यार्थी खेळाडूंना दिले आहेत.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

नाईट कुटुंबातील खेळाचा वारसा

  जिमी नाईट यांना फ्रिस्टाईल फुटबॉलसह गोल्फ खेळायला आणि धावायला आवडते. त्यांच्या कुटुंबातील एक भाऊ पोहण्यात तरबेज असून, त्यांचे आजोबा उत्कृष्ट टेबल टेनिस खेळाडू होते. त्यामुळे नाईट कुटुंबीयांना खेळाचा वारसा लाभला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील खेळाडूंना खेळातील बारकावे शिकवून जिमी नाईट खामगाव येथून धुळ्यात आले आणि आज ते नाशिक येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांना फुटबॉलचे धडे देणार आहेत.

- Advertisement -
भारताचे फुटबॉल भविष्य उज्ज्वल

  भारताच्या फुटबॉल क्षेत्राबद्दल जिमी नाईट यांनी सकारात्मक विचार व्यक्त केले. भारतातील सुप्रसिद्ध फुटबॉलपटू सुनील छेत्री हे उत्कृष्ट खेळाडू असल्याचे ते म्हणाले. भारतातील फुटबॉलपटू सक्षम असून, देशाचे फुटबॉल क्षेत्र उज्ज्वल आहे. तसेच, फुटबॉल खेळाडूंना प्रशिक्षित करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर तयार करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे, असे मत त्यांनी मांडले.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी पोद्दार इंटरनॅशनल अकॅडमीच्या ज्योती गाला, प्राचार्य भूषण उपासनी, समन्वयक जितेंद्र पिंगळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली असून, त्यांना फुटबॉलच्या नव्या तंत्रांची ओळख झाली आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -