धुळे दर्पण न्यूज :- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गानजीक वडजाई रोडवर असलेल्या प्लॅस्टिकच्या दाना फॅक्टरीला काल मध्यरात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचा प्लॅस्टिक दाना जळून खाक झाला. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

अचानक लागलेल्या आगीने घेतले भयंकर रूप

  वडजाई रोडवरील हॉटेल मुल्लाचा ढाबा आणि मन्नत रेसीडेन्सी पार्कच्या जवळच सलीम खाटीक यांच्या मालकीची प्लॅस्टिक दाना बनविण्याची फॅक्टरी आहे. काल रात्री ११.५५ च्या सुमारास या फॅक्टरीत अचानक आग लागली. प्रारंभी आग लहान स्वरूपात होती, मात्र प्लॅस्टिक आणि इतर ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे काही क्षणांतच आगीने भयंकर रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट परिसरभर पसरले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.


अग्निशमन दलाचा शर्थीचा प्रयत्न

  घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिस व अग्निशमन दलाला कळवले. काही वेळातच अग्निशमन विभाग प्रमुख दुष्यंत महाजन आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आगीची तीव्रता पाहता महापालिकेचे चार व टोल नाक्याचा एक अशा एकूण पाच बंब आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते.


  शहरातील विविध भागांतून पाणीपुरवठा करून ३२ फेऱ्यांमध्ये पाण्याचा मारा करत तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर पहाटे ३.३० वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. त्यानंतर सकाळी ५ वाजेपर्यंत कुलिंग ऑपरेशन सुरू होते.

- Advertisement -
लाखोंचा मुद्देमाल जळून खाक

  या आगीत फॅक्टरीतील मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकचा दाना आणि अन्य साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, नेमके नुकसान किती झाले याचा अहवाल अद्याप तयार करण्यात आलेला नाही. फॅक्टरी मालक सलीम खाटीक यांनीही ही मोठी आर्थिक हानी असल्याचे सांगितले.


पोलिसांचा तपास सुरू

  आग कशामुळे लागली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी घटनेचा पंचनामा सुरू केला असून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

स्थनिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  ही फॅक्टरी महामार्गानजीक वस्तीच्या ठिकाणी असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र, वेळेत अग्निशमन दल दाखल झाल्यामुळे आग आटोक्यात आली. तरीही या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षेचे उपाय अधिक कडक करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


- सैय्यद सानिल

(धुळे दर्पण)

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -