डागडुजी केवळ नावाला; दहा-पंधरा दिवसांपूर्वी बुजवलेले खड्डे पुन्हा जैसे थे

  धुळे दर्पण न्यूज :- नागपूर-सुरत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र, हे काम पूर्ण होण्यापूर्वीच महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. धुळे जिल्ह्यातील शेवाळी गावाजवळील बायपास, साक्री बायपास, नेर, विसरवाडी, अक्कलपाडा प्रकल्पाजवळ तसेच भदाणे गावाजवळ महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. महामार्गाचा काही भाग खचला असून, डांबरदेखील उखडले आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी खड्डे बुजवण्यात आले होते, पण काही दिवसांतच हे डांबर पुन्हा उखडून रस्त्यांची स्थिती जैसे थे झाली आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

डागडुजीसाठी केवळ मलमपट्टी!

  महामार्गाच्या देखभालीसाठी संबंधित ठेकेदाराला जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु निकृष्ट दर्जाची दुरुस्ती झाल्याने खड्डे पुन्हा पडत आहेत. नेर बायपास, अकलाड मोराणे-लोंढा नाला परिसर, विसरवाडी पोलिस चौकीजवळ आणि कावठे गावाजवळ खड्ड्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे.


  काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला दीड ते दोन फूट उंचवटा तयार झाला आहे, ज्यामुळे रात्रीच्या वेळी हे अडथळे न दिसल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. महामार्गावरील अनेक भागांत गतिरोधकाजवळ खड्डे पडले आहेत. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून वारंवार तक्रारी करूनही केवळ वरवरची मलमपट्टी करून विषय मिटवला जात आहे.

- Advertisement -

बारा वर्षांपासून काम संथगतीने सुरू; नागरिकांमध्ये तीव्र संताप!

  नागपूर-सुरत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील बारा वर्षांपासून सुरू आहे, परंतु अद्याप पूर्ण झालेले नाही. याच दरम्यान अनेक वेळा कंत्राटदार बदलले गेले. पण कामाचा दर्जा अत्यंत खराब असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.


  या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) साक्री तालुकाध्यक्ष गिरीश नेरकर यांनी “या कामाच्या दर्जाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. जर काम योग्य दर्जाचे झाले नाही, तर मोठ्या जनआंदोलनाचा इशारा देण्यात येईल” असे स्पष्ट केले.

- Advertisement -
महामार्ग प्राधिकरणाची प्रतिक्रिया

  या संपूर्ण प्रकरणावर महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता निखिल महाजन यांनी सांगितले की, “नागपूर-सुरत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराकडे आहे. ज्या ठिकाणी खड्डे पडले असतील किंवा रस्ता खचला असेल, तेथे तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या जातील.”

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल

  या खराब रस्त्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहने अनियंत्रित होत असून अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या खड्ड्यांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


  काही दिवसांपूर्वीच बुजवलेले खड्डे पुन्हा तसेच पडले असल्याने ठेकेदाराच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिक आणि प्रवासी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करत आहेत.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -