धुळे दर्पण न्यूज :- शहरातील मालमत्तेशी संबंधित एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल 35 वर्षांनंतर खोटे दस्तऐवज तयार करून एका व्यक्तीने संपूर्ण मालमत्तेवर हक्क सांगण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित व्यक्तीने बनावट दस्तऐवजांच्या आधारे मालमत्ता परस्पर विक्री करण्याचाही डाव आखल्याचे समोर आले आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
मूळ मालमत्तेचे वाटप आणि नंतरचा वाद
सदर प्रकरण मोतीलाल शेठ गोपालदास गुजराथी यांच्या मालमत्तेशी संबंधित आहे. 1954 साली त्यांनी ही मालमत्ता आपल्या वारसांमध्ये वाटून दिली होती. त्यानुसार, हिरालाल मोतीलाल शहा, बाबुलाल मोतीलाल शहा, नेमीचंद मोतीलाल शहा आणि युवराज मोतीलाल शहा यांच्यात ही मालमत्ता विभागली गेली.
नेमीचंद मोतीलाल शहा यांच्या वाट्याला आलेली मालमत्ता त्यांच्या पत्नी चंद्रावती नेमीचंद शहा आणि मुलगा योगेश नेमीचंद शहा यांच्या नावे करण्यात आली होती. पुढे या मालमत्तेतील 1466/1 या जमिनीचा काही भाग प्रदीप हिरालाल शहा यांनी विकत घेतला आणि त्यांच्या पत्नी पौर्णिमा प्रदीप शहा यांच्यासाठी बंगला बांधला.
![]() |
| -Advertisement- |
35 वर्षांनंतर बनावट दस्तऐवजांचा प्रकार
परंतु, 35 वर्षांनंतर प्रदीप हिरालाल शहा यांनी मूळ कागदपत्रांत फेरफार करत संपूर्ण मालमत्तेवर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही, तर नगर भूमापन कार्यालयाची कोणतीही मंजुरी किंवा अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसताना त्यांनी बनावट सिटी सर्व्हे उतारा तयार करून मालमत्ता परस्पर विकण्याचा घाट घातल्याचे उघड झाले आहे.
यासंदर्भात रेखा शहा यांनी पत्रकार परिषद घेत हा संपूर्ण प्रकार उघड केला. या पत्रकार परिषदेला संजय मुंदडा, चेतना योगेश शहा, मनन योगेश शहा आणि रेखा योगेश शहा उपस्थित होते.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
अधिका-यांवरही आर्थिक फायद्यासाठी दुर्लक्ष केल्याचा आरोप
या प्रकरणात दुय्यम निबंधक, धुळे वर्ग-2 कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. यावर अधिक माहिती देताना संजय मुंदडा यांनी सांगितले की, 24 नोव्हेंबर 2024 रोजी बनावट कागदपत्रांवर वारसदारांची नावे लावण्यात आली. वास्तविक पाहता, 1954 च्या सिटी सर्व्हे उताऱ्यात वडिलांचे नाव कंसात असल्याने त्यावेळी वारसदारांची नावे नव्हती. मात्र, आता कार्यालयातील काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही बनावट नोंदणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सदर प्रकरणाची माहिती सहाय्यक निबंधक वर्ग-2 यांच्या कार्यालयातील नोंदणी अधिकारी सौ. पाटील यांना देण्यात आली. मात्र, त्यांनी आर्थिक फायद्यासाठी ही नोंदणी स्वीकारली, असा आरोप रेखा शहा यांनी केला आहे.
मालमत्ता व्यवहार रोखण्यासाठी नोटीस
या प्रकरणाचा तपास सुरू असून मालमत्ता कोणीही खरेदी करू नये यासाठी स्थानिक वर्तमानपत्रात नोटीसा देण्यात आल्याचे रेखा शहा यांनी सांगितले.
भूमाफियांना अभय? 10-15 दिवसांपासून दबाव
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे धुळे शहरातील काही भूमाफिया दुय्यम निबंधक कार्यालयात दबाव टाकून बनावट खरेदी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे.
धुळे सिटी सर्व्हे नं. 1466/4 व 1466/5 मधील तीन हजार स्क्वेअर फूट जागेचा सौदा आधीच झाला असून लवकरच खरेदी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या मालमत्तेत एकही फूट जागा शिल्लक नसताना प्रदीप हिरालाल शहा हे बनावट व्यवहार करत असल्याचा आरोप संजय मुंदडा यांनी केला आहे.
![]() |
| - Advertisement - |
रेखा शहा यांची मागणी – योग्य तो न्याय मिळावा
या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस आणि इतर विभागांमार्फत आवाज उठवण्यात येत आहे. तसेच, या प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी रेखा शहा यांनी केली आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम


