धुळे दर्पण न्यूज :-  महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता येत्या ३० एप्रिलला, अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. याआधी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फेब्रुवारी व मार्च महिन्यांचे दोन हप्ते एकत्रितपणे खात्यावर जमा करण्यात आले होते. आता लाडक्या बहिणींना एप्रिल हप्त्याची प्रतीक्षा लागली असून, त्यासाठीची तयारी प्रशासनाकडून अंतिम टप्प्यात आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

लाभार्थ्यांची संख्याही ठरणार महत्त्वाची

  दहावा हप्ता मिळणाऱ्या बहिणींची संख्या यंदा वाढते की घटते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज सध्या महिला व बालविकास विभागामार्फत तपासणीसाधत आहेत. या पार्श्वभूमीवर काही लाभार्थींना पुढील लाभ थांबवण्यात येण्याची शक्यता असून, पात्र लाभार्थींना मात्र वेळेवर रक्कम जमा होईल, असा विश्वास वर्तवण्यात येत आहे.


आतापर्यंत ११ लाख अर्ज अपात्र

  सदर योजना २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी लागू असून, ६५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर महिलांचा लाभ बंद होतो. त्यामुळे योजनेतील लाभार्थ्यांची संख्या सातत्याने बदलत असते. आतापर्यंत अर्ज केलेल्या महिलांपैकी सुमारे ११ लाख अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. या सर्व अर्जांची फेरतपासणीही करण्यात येत असून, अपात्र ठरवताना निकषांचा काटेकोरपणे विचार केला जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -
अडीच कोटी महिलांना लाभ

  जुलै २०२४ पासून सुरु झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत २ कोटी ५३ लाख महिलांना लाभ देण्यात आला आहे. जुलै ते मार्च या ९ महिन्यांमध्ये एकूण १३,५०० रुपये प्रति लाभार्थी इतकी रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. सरकारने या योजनेसाठी आतापर्यंत ३३,२३२ कोटी रुपये खर्च केले असून, आगामी आर्थिक वर्षात ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


काही महिलांचा स्वयंस्फूर्त अर्ज मागे

  विशेष बाब म्हणजे, काही महिलांनी स्वतःहून आपण या योजनेसाठी पात्र नाही आहोत, असे सांगत अर्ज मागे घेतले आहेत. ही बाब शासनाच्या दृष्टीने सकारात्मक असून, योजना पारदर्शकपणे राबवण्यासाठी ही जबाबदारीचे लक्षण मानले जात आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

२१०० रुपये कधी मिळणार?

  महायुती सरकारने महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही अर्थसंकल्पात अशी कोणतीही तरतूद नसल्याचे स्पष्ट केले. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार म्हणाले की, "राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच महिलांना २१०० रुपये देण्याचा विचार केला जाईल."


  त्यामुळे लाडक्या बहिणींना २१०० रुपयांच्या लाभासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, नियमित हप्ते वेळेवर मिळावेत, यासाठी महिला व बालविकास विभागाने यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे.

---

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -