धुळे दर्पण न्यूज :- शिरपूर तालुक्यातील हाडाखेड परिसरात एक जून रोजी मोठी आणि महत्त्वपूर्ण कारवाई करत तालुका पोलिसांनी कत्तलीसाठी निर्दयीपणे वाहतूक केली जात असलेल्या ३० गोवंशांची सुटका केली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisement -

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून शिरपूरच्या दिशेने एक मालट्रक (क्र. आर.जे. ३२ जीसी २५४८) कत्तलीच्या उद्देशाने गोवंशांची अवैध वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने हालचाल करत हाडाखेड येथील सीमातपासणी नाक्यावर सापळा रचला. काही वेळातच संबंधित ट्रक त्या ठिकाणी आल्याचे दिसताच पोलिसांनी त्याला थांबवले आणि तपासणी केली.

तपासणीदरम्यान पोलिसांच्या निदर्शनास आले की, ट्रकच्या मागील भागात ३० गोवंश निर्दयपणे एकमेकांना बांधून ठेवण्यात आले होते. गोवंशांची ही स्थिती अत्यंत हृदयद्रावक होती. या जनावरांना कुठे आणि कशासाठी घेऊन जाण्यात येत आहे, अशी विचारणा पोलिसांनी ट्रकचालकाकडे केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी ट्रकचालक लखमेंद्र रामगोपालसिंग (रा. जानिपुर कलान, ता. शिकारपूर, जि. बुलंदशहर, उत्तर प्रदेश) यास तत्काळ अटक केली.

- Advertisement -

या कारवाईत पोलिसांनी एकूण ३० गोवंश (सुमारे २.५८ लाख रुपये किमतीचे) आणि वापरण्यात आलेला ट्रक (सुमारे २० लाख रुपये किमतीचा) असा एकूण २२.५८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या संपूर्ण कारवाईसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, हवालदार शेखर बागुल, सागर ठाकूर, जगन्नाथ कोळी, पोकॉ. धनराज गोपाळ, मनोज पाटील यांनी परिश्रम घेतले. याप्रकरणाचा पुढील तपास हवालदार बागुल करीत आहेत.

या कारवाईमुळे गोवंश वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार असून, प्राण्यांवरील क्रूरतेविरुद्ध पोलिसांचा कठोर पवित्रा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. जिल्ह्यात अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीवर बंदी आणण्यासाठी अशाच कठोर कारवाया गरजेच्या असल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे.