'सर्व्हर डाउन'मुळे कामकाजात खोडा...!

  धुळे दर्पण न्यूज :- शासनाच्या डिजिटल युगात सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने करण्यावर भर दिला जात असताना, धुळे तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत मागील पंधरा ते वीस दिवसांपासून सतत सर्व्हर डाऊन राहत असल्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. विशेषतः रेशन कार्डसंदर्भातील नाव समाविष्ट करणे, वगळणे, केवायसी प्रक्रिया आदी कामे रखडली असून, यामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

  तहसील कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांची सकाळपासून रांग लागते. मात्र, सर्व्हर सुरू नसल्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते. हेच चित्र दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे. अनेक जण लांबवरून येतात, वाहतूक खर्च करतात, कामाच्या सुट्ट्या घेतात, मात्र शेवटी निराशाच पदरी येते. कार्यालयातील कर्मचारीही हतबल झाले असून, अनेकदा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरसीएमएस प्रणाली ठरतेय ढासळलेली

  पुरवठा विभागाने रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टिम (RCMS) प्रणालीद्वारे नागरिकांच्या सेवा ऑनलाइन करण्याचा प्रयत्न केला. पण सद्यस्थितीत या प्रणालीचा वेग अत्यंत कमी असून, ती सतत अडकते. त्यामुळे एकच काम करण्यासाठी नागरिकांना अनेक वेळा तहसील कार्यालयाची दारे ठोठवावी लागत आहेत. केवळ ग्रामीणच नव्हे तर शहरातील नागरिकांनाही याचा फटका बसत आहे.

- Advertisement -
शासनाच्या डिजिटल धोरणाला सुरूंग

  सर्व्हर डाउन असल्यामुळे रेशन कार्डसह विविध प्रमाणपत्रे, दाखले, ओळखपत्रे यांसाठीची प्रक्रिया ठप्प झाली आहे. विशेषतः दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असलेले कागदपत्र मिळवताना अडचणी येत आहेत. सेतू केंद्रांवरून हे दस्तावेज मिळवण्यासाठी रांगा लागत असून, यामध्ये तांत्रिक अडचणींमुळे विलंब होत आहे. परिणामी विद्यार्थी आणि पालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

नायब तहसीलदार प्रशिक्षणात, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण

  धुळे तहसील कार्यालयात नेमण्यात आलेले नायब तहसीलदार प्रशिक्षणासाठी बाहेर गेले असल्यामुळे कार्यालयीन कामकाजावर त्याचा परिणाम झालेला दिसतो. त्यातच सततचा सर्व्हर डाऊनचा प्रश्न असल्याने कर्मचारी देखील त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या तक्रारी, राग, रोष यांना ते कसेतरी सामोरे जात आहेत. अनेकदा कार्यालयात वादविवादाचे प्रसंग घडत असून, यावर तातडीने तोडगा काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

"तांत्रिक अडचणी दूर करा, नागरिकांना दिलासा द्या" – जनतेची मागणी

  नागरिकांनी यासंदर्भात तक्रारी दाखल केल्या असून, त्यांनी तहसील प्रशासनाने लवकरात लवकर तांत्रिक समस्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. "ऑनलाइन सुविधा म्हणता, पण सर्व्हरच बंद असेल तर आम्हाला न्याय कसा मिळणार?" असा सवाल आता सर्रास विचारला जात आहे. तांत्रिक अडचणी दूर करून व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी जोर धरत आहे.


धुळे दर्पण विशेष
  'डिजिटल इंडिया'ची घोषणा भलेही मोठ्या आवाजात होत असली, तरी तळागाळातील कार्यालयांमध्ये सुविधा पोहोचल्या नाहीत तर 'डिजिटल यंत्रणा' केवळ नावापुरती राहील!'

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -