धुळ्यात एसबीआयच्या नावाने सायबर भामट्यांचा धुमाकूळ! अनेकांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक; ग्रुपमध्येही हॅकर्सचा शिरकाव

  धुळे दर्पण न्यूज :- धुळे जिल्ह्यात आज सकाळपासून अनेक नागरिकांच्या मोबाईलवर एक विचित्र प्रकार दिसून आला आहे. व्हॉट्सअ‍ॅप उघडताच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) नावाने अनेक नवे ग्रुप त्यांच्या मोबाईलमध्ये आपोआप तयार झाले होते. यामध्ये एक दुवा (लिंक) पाठवण्यात आला होता, ज्यावर क्लिक केल्यास 'बक्षीस मिळेल' अशी माहिती देण्यात आली होती. एसबीआयसारख्या विश्वासार्ह सरकारी बँकेच्या नावावर असलेल्या या मेसेजवर विश्वास ठेवून अनेकांनी ही लिंक उघडली. मात्र, ही चूक ठरली, कारण त्या लिंकवर क्लिक करताच त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटचा ताबा हॅकर्सच्या हाती गेला.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:


साखळी पद्धतीने हॅकिंगचा फैलाव!

व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक होताच, संबंधित व्यक्ती ज्या ज्या ग्रुपचा भाग होती, त्या सर्व ग्रुपचे नाव व डिस्प्ले पिक्चर (DP) हॅकर्सने बदलून टाकले. हा प्रकार इतक्या जलद वेगाने घडला की बघता बघता अनेकांचे अकाउंट धोक्यात आले. काहीजण तर आपोआप ग्रुपमधून काढून टाकले गेले. या घडामोडींनी धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सोशल मीडियावर गोंधळ उडाला असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

- Advertisement -

बापूजी शेलार यांच्याही अकाउंटवर हॅकर्सचा डोळा

श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र उर्फ बापूजी शेलार यांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट देखील हॅक झाले आहे. त्यांच्या नावाने खोटा एसबीआय मेसेज पसरवण्यात आला. बापूजींना ओळखणाऱ्या अनेकांनी हा मेसेज खरा समजून तो उघडला आणि त्यांच्या खात्यांवरही हॅकर्सचा शिरकाव झाला. हे अकाउंट हॅक होताच संबंधितांचे ग्रुप्सही हॅकर्सच्या निशाण्यावर आले.


मागील घटनांचाही आठव

धुळे जिल्ह्यात याआधीही सायबर गुन्हे घडले आहेत. काही महिन्यांपूर्वी एका उद्योजकाच्या व्हॉट्सअ‍ॅपवरून बनावट मेसेज पाठवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. त्या घटनेत व्हॉट्सअ‍ॅपचे क्लोन अकाउंट तयार करून, संपर्क यादीतील व्यक्तींना पैसे मागणारे मेसेज पाठवण्यात आले होते. या घटनेनंतर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सोशल मीडियावर सतर्क राहा!

सध्या सोशल मीडियावर अनेक सायबर भामटे सक्रिय असून ते WhatsApp, Facebook, Instagram यांसारख्या माध्यमांवरून फसवणूक करत आहेत. केवळ लिंकच नव्हे, तर फोटो किंवा इमेज उघडल्यावरसुद्धा मोबाईल हॅक होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही लिंक, विशेषतः SBI किंवा अन्य बँकच्या नावाने आलेली, उघडण्याआधी काळजी घ्यावी.

- Advertisement -

हॅक झाल्यास त्वरित काय करावे?

जर तुमचे व्हॉट्सअ‍ॅप किंवा सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले असेल, तर लगेचच खालीलप्रमाणे कृती करा:

1930 या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करा
www.cybercrime.gov.in वर ऑनलाईन तक्रार नोंदवा
✅ व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक व इन्स्टाग्रामसाठी स्वतंत्र QR कोड सरकारने जारी केले आहेत – त्याद्वारे तक्रार नोंदवता येते.
✅ शक्य असल्यास तात्काळ स्थानिक सायबर पोलीस ठाण्यात भेट द्या


सावध राहा, सायबर सुरक्षित राहा!

ही घटना ही धुळे जिल्ह्यात सायबर सुरक्षेच्या दृष्टीने मोठा इशारा आहे. सोशल मीडिया आणि मोबाईल अ‍ॅप्स वापरताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कुणाच्याही पाठवलेल्या लिंकवर क्लिक करण्याआधी खात्री करा. कारण, एक चुकीची क्लिक तुमचे संपूर्ण डिजिटल जीवन धोक्यात आणू शकते!


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -