धुळे दर्पण न्यूज :- भडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोटारसायकल चोरीचे सत्र सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
एलसीबीला मिळालेल्या माहितीनुसार, शेख इमरान शेख रफिक (वय २४, रा. ग्रीन पार्क कॉलनी, भडगाव – सध्या रा. अंबिकानगर, १०० फुटी रोड, धुळे) व त्याचा साथीदार शेख अकिल शेख शफिक (वय २७, रा. जलाली मोहल्ला, भडगाव) हे दोघे मिळून मोटारसायकल चोरी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
![]() |
| - Advertisement - |
ही माहिती मिळाल्यानंतर पथकाने पाचोरा शहरात सापळा रचून संशयित दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे व पत्ते सांगितले असून, पोलिसांनी अधिक कसून चौकशी केल्यावर त्यांनी भडगाव शहरातील विजय हॉटेलसमोर व खोल गल्लीतील सलूनसमोरून अनुक्रमे हिरो कंपनीची व बजाज पॅलेटीना मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
भडगाव पोलिस ठाण्यात यापूर्वीच गुन्हे दाखल
या चोरीप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २२६/२०२५ व २५०/२०२५, भा.दं.वि. कलम ३७९ अंतर्गत गुन्हे आधीच दाखल आहेत. आरोपींच्या ताब्यातील आणखी एका काळ्या रंगाच्या अॅक्टीव्हा मोपेडबाबत माहिती समोर आली आहे.
धुळे जिल्ह्यात अनेक गुन्ह्यांत संलिप्तता
अधिक तपासात शेख इमरान याच्यावर धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी, चोरी, मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. तो एक सराईत गुन्हेगार असून, विविध पोलिस ठाण्यांच्या रडारवर होता.
सध्या पोलिस त्यांच्याकडून आणखी मोटारसायकल चोरी व इतर गुन्ह्यांची माहिती घेत असून, दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी भडगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
ही कारवाई एलसीबी पथक व स्थानिक पोलिसांच्या चपळतेचे उत्तम उदाहरण ठरत असून, चोरीच्या घटनांवर आळा घालण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे.


