धुळे दर्पण न्यूज :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरलेल्या ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलला सरकारी रायफलमधून निघालेल्या गोळीने गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना आज (६ ऑगस्ट) सकाळच्या सुमारास घडली. कॉन्स्टेबल उमेश दिनकर सूर्यवंशी (वय ४८) हे या घटनेत गंभीररित्या जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
ही घटना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळील वखार महामंडळाच्या गोदामात घडली असून या गोदामात मागील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरलेली ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ड्युटीवर असताना सूर्यवंशी यांच्या खांद्याजवळून त्यांच्या सरकारी रायफलमधून अचानक गोळी सुटली आणि ती थेट त्यांच्या शरीरात घुसली.
![]() |
| - Advertisement - |
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, आझाद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक निवृत्ती पवार आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी जखमी कॉन्स्टेबलची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयाला भेट दिली.
प्राथमिक माहितीनुसार, गोळी ही अपघाताने सुटली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र गोळी अपघाताने सुटली की स्वतःच्या इच्छेने झाडली गेली, याबाबत पोलीस प्रशासन अजूनही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाही. सूर्यवंशी हे सध्या बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे त्यांचा जबाब नोंदवता आलेला नाही.
या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती, ड्युटी दरम्यानचे तणाव याकडेही तपास अधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
पुढील तपास आझाद नगर पोलीस ठाण्यातून करण्यात येत असून, या प्रकरणात योग्य ती चौकशी करून सत्य समोर आणले जाईल, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. दरम्यान, जखमी पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी पोलीस दलाकडून प्रार्थना व्यक्त केली जात आहे.


