धुळे दर्पण न्यूज :- धुळे महानगरपालिकेच्या (मनपा) कामकाजात आता डिजिटल क्रांती घडत असून, सर्व कार्यालयीन कामकाज ई-ऑफिस प्रणालीद्वारे पार पडणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या आदेशानुसार सर्व विभागांचे संगणकीकरण करण्यात आले असून, नूतन प्रशासकीय इमारतीत ई-ऑफिसचा वापर सुरू झाला आहे.
सर्व विभाग संगणकाधारित
मनपाच्या विविध विभागात आता फाइल हातोहात फिरण्याऐवजी थेट संगणकावरून पुढे पाठवण्यात येत आहे. यामुळे दप्तरदिरंगाईला आळा बसून कामाचा वेग वाढेल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. विभाग प्रमुखांपासून उपायुक्त, सहायक आयुक्त आणि अखेरीस आयुक्त यांच्यापर्यंत फाइलची डिजिटल शृंखला तयार झाली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
१६० संगणक उपलब्ध
संपूर्ण मनपात जवळपास १६० संगणक विभागांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी आता संगणकाच्या साहाय्यानेच दैनंदिन कामकाज करत आहेत. कार्यालयीन नोंदी, अहवाल, मंजुरी यांसारख्या सर्व प्रक्रिया आता ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत.
![]() |
| - Advertisement - |
ई-टपालची सुरुवात
ई-ऑफिससोबतच मनपात ई-टपाल प्रणालीही सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिक आणि शासनाकडून येणारे पत्रव्यवहार त्वरित नोंदवले जात आहेत. आतापर्यंत ७४ फाइल्स ई-टपालवर अपलोड करण्यात आल्या असून, विभागनिहाय त्यावर तत्काळ कार्यवाही होत आहे.
कामकाजात पारदर्शकता व कार्यक्षमता
या डिजिटल प्रणालीमुळे फाइल प्रक्रिया सोपी झाली असून, कामकाजात पारदर्शकता येणार आहे. पूर्वी कागदोपत्री विलंबामुळे होणारी नागरिकांची गैरसोय आता कमी होईल. तसेच मनपाच्या प्रशासकीय कार्यात गती, कार्यक्षमता व जबाबदारी वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
धुळे मनपा प्रशासनाच्या या पावलामुळे शहरातील नागरी सुविधांबाबतची कामे जलदगतीने मार्गी लागतील, अशी आशा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


