३६७ ठिकाणी दोन नंबरचे धंदे सुरू; ७५ कोटींची उलाढाल; पोलिस व प्रशासनाचे पाठबळ असल्याचा आरोप

  धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहर आता अवैध व दोन नंबरच्या धंद्यांचे राजधानी ठरत असल्याचे खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे शहर जिल्हाध्यक्ष रणजीतराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत केले. धुळे शहरात तब्बल ३६७ ठिकाणी विविध प्रकारचे अवैध धंदे सुरू असून त्यातून तब्बल ७५ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होत असल्याचे त्यांनी उघड केले. विशेष म्हणजे, जे अधिकारी अशा धंद्यांवर कारवाई करायला हवे, तेच राजकीय नेत्यांप्रमाणे वागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वातावरण गढूळ करणारे दोन नंबरचे धंदे

  भोसले यांनी सांगितले की, शहरातील तणाव, मारामाऱ्या, खून, दरोडे, चोऱ्या यामागचे प्रमुख कारण म्हणजे वाढलेले अवैध धंदे. सट्टा, मटका, चक्री, गुटखा विक्री, गांजा, कोरेक्स, अवैध दारू, चोरीचे भंगार, वाळू व गौण खनिजांची बेकायदेशीर विक्री, बनावट डांबर, अवैध जनावर वाहतूक, फोर पीस, चोरी व विम्याच्या गाड्यांचे स्क्रबिंग यांसह ३६७ ठिकाणी दोन नंबरचे धंदे सर्रास सुरू आहेत.

  या अवैध धंद्यांना काही राजकीय व्यक्ती व प्रशासनातील अधिकारी-महत्वाचे कर्मचारी थेट पाठबळ देत असल्याचा दावा भोसले यांनी केला.

- Advertisement -

पोलिसांवर थेट आरोप

  शहरातील काही पोलीस अधिकारी व कर्मचारी अवैध धंदेवाल्यांकडून आर्थिक लाभ घेऊन त्यांना संरक्षण देतात, असा गंभीर आरोप भोसले यांनी केला. परिणामी शहरात गुंडगिरी, दादागिरी आणि बेकायदेशीर शस्त्रांचा वापर वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
  “शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांकडे गावठी कट्टे, पिस्तुल, तलवारी आढळत आहेत, ही अतिशय धोकादायक बाब आहे. शहराचा विकास खुंटला असून नवीन गुंतवणूकदार किंवा नागरिक धुळ्याकडे वळायला घाबरत आहेत,” असे त्यांनी नमूद केले.

मागण्या व इशारा

 भोसले यांनी पत्रकार परिषदेत प्रशासनाकडे खालील ठोस मागण्या केल्या –

  • धुळे शहरातील सर्व अवैध धंद्यांवर तात्काळ धडक कारवाई करावी.
  • अवैध ठिकाणांवर छापे टाकून गावठी कट्टे, पिस्तुल, तलवारी, चाकू, फायटर अशी शस्त्रे जप्त करावीत.
  • दोषींवर कडक कारवाई करून शहरातील कायदा सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करावी.

  याबाबत ५ मे २०२५ रोजी त्यांनी पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन दिले होते. तसेच जून महिन्यात पक्षाचे शिष्टमंडळ घेऊन पोलीस अधीक्षकांना भेटही दिली होती. परंतु त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

  “जर यापुढेही कारवाई झाली नाही तर आम्ही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सर्व पुरावे सादर करू,” असा इशारा रणजीतराजे भोसले यांनी दिला.

धुळेतील अवैध धंद्यांची आकडेवारी (रणजीतराजे भोसले यांच्यानुसार)

  • सट्टा पेढी – १८०
  • चक्री – २२
  • गांजा विक्री – ३०
  • अवैध गॅस पुरवठा – २०
  • कोरेक्स विक्री – १५
  • वाळू विक्री – १२
  • मटका – १०
  • सोरट – १०
  • गुटखा विक्री – १०
  • बनावट दारू विक्री – ६
  • अवैध गौण खनिज विक्री – ६
  • डुबलीकेट डांबर – ३
  • केमिकल – ५
  • फोर पीस – ५
  • चोरीचे भंगार – ५
  • चोरी व विम्याच्या गाड्यांचे स्क्रबिंग – ५
  • अवैध कॅफे – ८
  • जनावरांची अवैध वाहतूक – ८
  • टायगर – ३
  • काला पिला – २
  • देहविक्री – २

  धुळे शहरातील वाढलेले हे अवैध धंदे व त्यामागील प्रशासनाचे ढिलाई यामुळे जनतेत असंतोष पसरला आहे. भोसले यांनी स्पष्ट केले की, धुळेकरांनी स्वच्छ, सुरक्षित व शांत शहरासाठी लढा देणे आवश्यक आहे. अन्यथा शहराची ओळख ‘अवैध धंद्यांची राजधानी’ अशी होईल.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -