या कारवाईबाबत अधिक माहिती अशी की, अन्न व औषध प्रशासनाला बल्लाने गावातील एका घरात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्नसुरक्षा अधिकारी आनंद भाऊराव पवार आणि त्यांच्या पथकाने 29 सप्टेंबर रोजी त्या घरावर छापा टाकला. छाप्यादरम्यान घरात साठवून ठेवलेला गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या साठ्याची अंदाजे किंमत 98,516 रुपये असल्याचे अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
तपासानुसार, आरोपी वकीललाल पाटील हा बल्लाने गावात राहत असून, त्याने घरातच विक्रीसाठी गुटखा व पान मसाल्याचा साठा केला होता. महाराष्ट्रात गुटखा आणि पान मसाला विक्रीस बंदी असतानाही, आरोपीने हा साठा विक्रीसाठी ठेवला असल्याचे उघड झाले आहे. यामुळे अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करत हा साठा जप्त केला आणि आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या प्रकरणात आरोपीविरुद्ध अन्नसुरक्षा अधिकारी आनंद भाऊराव पवार यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपीला 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेतीन वाजता ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या धुळे तालुका पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
धुळे जिल्ह्यात अशा प्रकारच्या प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठ्याचा व्यवसाय अजूनही काही ठिकाणी सुरू असल्याचे या घटनेमुळे उघड झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाने अशा प्रकारच्या अनधिकृत साठ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून अशा प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्रीवर आळा बसू शकेल.
या प्रकरणात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांची संयुक्त कारवाई झाल्यामुळे जिल्ह्यातील अनधिकृत गुटखा आणि पान मसाला विक्रेत्यांवर दडपण येणार आहे. जिल्ह्यात अशा प्रकारच्या कारवायांना अधिक तीव्रता देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे, कारण प्रतिबंधित अन्नपदार्थांमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सर्वांसमोर आहेत.
