धुळे दर्पण न्यूज:- शिंदखेडा: शासनाने मुद्रांक शुल्क व दंड माफी सवलत अभय योजना-२०२३ लागु केलेली आहे. सध्या सुरु असलेल्या योजनेचा दुसरा टप्पा ३१ ऑगस्ट, २०२४ रोजी संपल्याने शासनाने या टप्प्यास ३० सप्टेंबर, २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

अशी माहिती प्रभारी सह जिल्हा निबंधक वर्ग-२ तथा प्रशासकीय अधिकारी एस. पी. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. मुद्रांक शुल्क व दंड माफी सवलत अभय योजना-२०२३ मध्ये दि. ३० सप्टेंबर, २०२४ या कालावधी पर्यंत सहभाग नोंदवल्यास थकलेल्या मुद्रांक शुल्कावर २० टक्के व त्यावरील दंडाच्या रकमेवर ८० टक्के माफी राहणार आहे. ज्या पक्षकार किंवा नागरिक यांचेकडे

मुद्रांक शुल्काची रक्कम थकीत आहे, त्यांना अभय योजना-२०२३ च्या दुस-या टप्प्यास ३० सप्टेंबर, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता पक्षकार किंवा नागरिक यांनी विहीत नमुन्यातील अर्ज ३० सप्टेंबर, २०२४ पावेतो सह जिल्हा निबंधक वर्ग-१, धुळे या कार्यालयाकडे अथवा या कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सह दुय्यम निबंधक / दुय्यम निबंधक कार्यालयांकडे सादर करुन मुद्रांक शुल्क व दंडाच्या रक्कमेवर सवलतीनुसार रक्कम जमा करावी. 

तसेच शासनामार्फत सुरु असलेल्या अभय योजना-२०२३ अंतर्गत मुद्रांक शुल्क व दंड सवलत योजनेच्या दुस-या टप्प्याचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी सुनिल पाटील यांनी केले आहे.