धुळे दर्पण न्यूज:- धुळे शहराजवळील नगाव परिसरातील धमाणे फाटा येथे आज संध्याकाळी ४:०० ते ४:३० वाजता घडलेल्या एका मोठ्या अपघातात दोन बसची धडक झाली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर घडला असून अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
अपघाताचे मुख्य कारण पुढे चाललेल्या दुचाकीसमोर अचानक एक श्वान येणे होते. श्वान समोर आल्यामुळे दुचाकी चालकाने अचानक ब्रेक दाबला, ज्यामुळे त्याच्या मागे येणाऱ्या बस चालकाला सुद्धा अचानक ब्रेक मारावे लागले. परंतु, त्याच वेळी मागून येणारी दुसरी बस वेगात असल्याने ती समोरील बसवर धडकली.

या धडकेत बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे.