धुळे दर्पण न्यूज:- धुळे: मुंबई-आग्रा महामार्गावरील नगावबारी परिसरात गुरुवारी, 19 सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास एक मोठी घटना समोर आली आहे. एका अपघातग्रस्त पिकअप वाहनात चालकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व मृतदेह ताब्यात घेतला.

मृत चालकाचे नाव गणपत शंकर गांगुर्डे (वय 52, राहणार जोरण, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक) असे असून, त्यांचा मृतदेह पिकअप वाहनाच्या मागील बाजूस गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी मृतदेह तात्काळ उत्तरीय तपासणीसाठी धुळे सिविल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे.


पोलिस तपासादरम्यान असे उघड झाले की, एमएच-15 जेसी-5785 क्रमांकाचे हे पिकअप वाहन मध्यप्रदेशातील नाहरगड येथून मुंब्रा, मुंबई येथे लसूण घेऊन जात होते. 19 सप्टेंबर रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास धुळे शहराजवळील नगावबारी परिसरात या वाहनाचा अपघात झाला होता. अपघातामुळे पिकअप वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, याची माहिती चालकाने वाहनमालकाला दिली होती.

तथापि, गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास गणपत गांगुर्डे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने पोलिस तपास अधिक गहिरा झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत. अपघातानंतर घडलेल्या या विचित्र घटनेमुळे स्थानिकांमध्ये आणि वाहतूक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
advertising