धुळे दर्पण न्यूज:- धुळे शहरातील नेहरूनगर परिसरातील सुशी नाल्याजवळ आज प्रभाग क्रमांक चारमध्ये माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांच्या हस्ते बंदिस्त गटारीच्या कामाचा दहा लाख रुपयांच्या निधीतून शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, महिला आणि विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेहरूनगर परिसरात नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण झाले होते. मात्र, या पुलाजवळील भागात गटार नसल्याने पावसाचे आणि नाल्याचे पाणी रस्त्यावर वाहत होते, ज्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या समस्या लक्षात घेऊन माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी तातडीने दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आणि बंदिस्त गटारीच्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले.
सदर कामामुळे परिसरातील नागरिकांना होणारा त्रास कमी होईल, तसेच स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल. परिसरातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, विशेषतः महिलांनी चौधरी यांचे आभार मानले आहेत. या कार्यक्रमात स्थानिक महिला आणि नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते, ज्यामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण प्राप्त झाले.
प्रभाग क्रमांक चारमध्ये असे उपक्रम राबवून सार्वजनिक सोयी-सुविधांचा विकास करण्यात येणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

