धुळे दर्पण न्यूज:-
 धुळे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अपर तहसिलदार कार्यालय, धुळे शहर आणि मुक्ता आदिवासी बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ५.३० वाजता धुळे पोलीस मुख्यालय परेड मैदानावर हा कार्यक्रम संपन्न झाला. जिल्हा स्वीप नोडल अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे व मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.


  कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्यांमध्ये सुनील ढवळे यांचा समावेश होता. त्यांनी होमगार्ड बांधवांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगताना, कोणत्याही आमिषाला बळी न पडता जबाबदारीने आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. ढवळे यांनी उपस्थितांना मतदानाचे महत्त्व अधोरेखित करताना, मतदारांनी विवेकबुद्धीने आणि लोकशाहीची जपणूक करण्यासाठी मतदान करावे असे सांगितले. २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांनी सज्ज राहावे आणि आपला हक्क प्रामाणिकपणे बजवावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  यावेळी कार्यक्रमात सहभागी होमगार्ड सदस्यांना मतदानाच्या महत्त्वाची प्रतिज्ञा देण्यात आली, ज्यात त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि स्वच्छ, निर्भय मतदान प्रक्रियेच्या दिशेने प्रयत्नशील राहण्याची शपथ घेतली. या शपथविधीमुळे सहभागी सदस्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.


  कार्यक्रमाला इतर मान्यवरांचेही मोलाचे योगदान मिळाले. आयटीआयचे शिल्प निदेशक सुनील गावडे, कलाशिक्षक संघरत्न निरकर, कनिष्ठ लिपिक नाना पाटील, रुपेश वाडीले तसेच मुक्ता आदिवासी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मोनिका शिंपी या सर्वांनी मतदार जनजागृतीसाठी योगदान दिले. त्यांनी मतदारांमध्ये जनजागृती आणण्यासाठी भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन केले.


  धुळे शहर विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप नोडल अधिकारी व मनपा उपायुक्त शोभा बाविस्कर यांनी कार्यक्रमातील विविध उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमाला शहरातील विविध संस्था, सामाजिक संघटना, आणि होमगार्ड कर्मचारी यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


  जिल्ह्यातील नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जागृती निर्माण करून, अधिकाधिक मतदान घडवून आणणे, हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू होता. जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाच्या निमित्ताने मतदारांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देत, लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली.