गोटेंच्या म्हणण्यानुसार, मतदान यंत्रांशी छेडछाड करण्याचा भाजपाचा कट असून त्यासाठी संगणक तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पत्रात सांगितले आहे की, एका संगणक तज्ज्ञाला २ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता वाशी रस्त्यावर २ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली. या व्यवहारासाठी पांढऱ्या रंगाची ओमनी व्हॅन वापरण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप:
गोटे यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, मतदान यंत्रांच्या सॉफ्टवेअर क्रमांकांची माहीती सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना कशी मिळाली, हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. या यंत्राद्वारे मतदारांचा कौल पाहून निकालांमध्ये फेरफार करण्याचा भाजपाचा कट असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
गोटेंच्या म्हणण्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांची बदलीही पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या शिफारसीवरून झाली आहे. त्यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना चेतावणी दिली आहे की, निवडणुकीत निष्पक्षता राखणे ही त्यांची जबाबदारी आहे आणि कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा लोकशाही प्रक्रियेसाठी धोकादायक ठरेल.
'मी शांत आहे, पण मनमानी सहन करणार नाही': गोटेंचा इशारा
गोटे यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले की,
“मी ५५ वर्षांपासून या शहराच्या राजकारणात कार्यरत आहे. निष्कलंक चारित्र्य आणि स्पष्टवक्तेपणा हेच माझे भांडवल आहे. आपण नव्याने जिल्हाधिकारी म्हणून आलात म्हणून आपला आदर आहे, पण धुळे जिल्ह्यात आपण केल्या गेलेल्या बदल्या आणि त्यामागील व्यवहार मला माहिती आहेत. तरीही मी या प्रकरणांकडे दुर्लक्ष केले, याचा अर्थ तुम्हाला मनमानी करण्याची मुभा दिली असे नाही.”
त्यांनी आणखी लिहिले की,
“शिशुपालाच्या १०० पापांचा घडा भरण्यापर्यंत मी शांत असतो. पण जर निवडणूक प्रक्रियेत काही चुकीचे घडत असेल, तर मला न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याशिवाय पर्याय उरणार नाही.”
'लोकशाहीला धोका': गोटेंचा प्रशासनावर आरोप
गोटेंनी जिल्हाधिकाऱ्यांवर निवडणुकीच्या दिवशी पक्षपाती अधिकार्यांची नियुक्ती करण्याचा दबाव असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या नियुक्त्या लोकशाही प्रक्रियेसाठी अत्यंत घातक ठरतील, असे त्यांनी पत्रात नमूद केले.
तसेच, त्यांनी सांगितले की, या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मदत करण्यासाठी संगणकीय हस्तक्षेपाचा कट रचला गेला आहे. त्यांनी प्रशासनाला सावध करताना म्हटले की,
“जर अशा प्रकारे काहीही शिजले नसेल, तर ही आनंदाची बाब आहे. पण जर वस्तुस्थिती वेगळी असेल, तर मी ती उघड करण्यासाठी कोणत्याही टोकाला जाईन.”
गोटेंच्या पत्रामुळे खळबळ:
अनिल गोटेंच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपाकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या पत्रामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून या पत्राची दखल घेतली जाईल का, आणि निवडणूक प्रक्रियेत या आरोपांवर काय भूमिका घेतली जाईल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
गोटेंची मागणी:
गोटेंनी निवडणुकीसाठी निर्भय वातावरण निर्माण करण्याची आणि सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही कट कारस्थानांना चाप लावण्याची मागणी केली आहे. त्यांनी पत्रात स्पष्ट केले की,
“मी धमकी देत नाही, तर जनहितासाठी तुम्हाला सावध करत आहे. निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचा मला आणि जनतेलाही विश्वास हवाय.”
