धूळे दपर्ण न्यूज :- धुळे दि. २३ नोव्हेंबर २०२४ लोकशाहीला मोठा धक्का: विधानसभेच्या निकालांवर माजी आमदार अनिल गोटे यांचा तीव्र संताप
महाराष्ट्र विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकांमध्ये भाजपाच्या दणदणीत विजयाने मोठी चर्चा रंगली असताना, धुळे शहरातून पराभूत झालेले माजी आमदार व कार्यसम्राट अनिल अण्णा गोटे यांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत राज्यातील लोकशाही प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गोटे यांनी ही निवडणूक "सत्तेचा नंगानाच" आणि "लोकशाहीला मूठमाती देण्याचा प्रकार" म्हणून संबोधत भाजपावर थेट आरोप केले. पैशांच्या जोरावर झालेल्या या निवडणुकीने राज्यातील राजकीय व सामाजिक मूल्यांना मोठा धक्का दिल्याचे ते म्हणाले.
पैशांचा महापूर आणि लोकशाहीचा ऱ्हास
अनिल गोटे यांनी भाजपावर गंभीर आरोप करत सांगितले की, "या निवडणुकीत पैशांचा इतका मोठा वापर झाला की, जनतेला विकत घेण्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे. महाराष्ट्रात जे घडले ते फक्त येथेच थांबलेले नाही, तर देशभर लोकशाहीच्या मुळावर प्रहार करणारा एक चुकीचा संदेश दिला गेला आहे."
ते पुढे म्हणाले, "सामान्य माणसांपेक्षा जनावरे महाग असतात, असा अप्रत्यक्ष संदेश राज्यभर पसरला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात असा प्रकार यापूर्वी कधीही पाहायला मिळाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जिथे कधीच स्वाभिमानास कमी होऊ दिले नाही, तिथे आज दोन-पाचशे रुपयांत विकला गेला आहे."
प्रशासनावरही गंभीर आरोप
गोटे यांनी प्रशासनावरही ताशेरे ओढले. "प्रशासनाच्या सक्रीय सहभागानेच भाजपाने निवडणूक जिंकली आहे. मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला की सामान्य मतदारांच्या मनात भाजपाचा विजय आधीच निश्चित असल्याचे चित्र निर्माण झाले. पण प्रत्यक्षात यंत्रांमध्ये हेराफेरी व अफरातफर करून निवडणुकीचा निकाल फिक्स केला गेला," असे त्यांनी सांगितले.
राज्यभरातील प्रश्न दुर्लक्षित
राज्यातील गंभीर समस्यांकडे सत्ताधारी पक्षाने दुर्लक्ष केल्याबद्दल गोटे यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, "शेतकरी आत्महत्या, सोयाबीन व कापसाचे गडगडलेले भाव, खतांचे वाढलेले दर, महागाई आणि बेरोजगारीच्या समस्यांकडे सरकारने पाठ फिरवली आहे. महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न तर दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील महिलांवर होणारे अत्याचार, बलात्कार, छळ यामुळे समाज अस्थिर होत आहे, पण हे सर्व मुद्दे निवडणुकीत विसरले गेले."
धुळे शहराचे भविष्य धोक्यात
धुळे शहराच्या मतदारांवर नाराजी व्यक्त करत गोटे म्हणाले, "या निवडणुकीने धुळे शहराची लायकी काढली आहे. येथे मतदारांवर प्रचंड दबाव टाकण्यात आला. पैशांच्या वितरणाने मतदारांच्या मनात गोंधळ निर्माण केला. खरेतर, यंत्रात केलेल्या हेराफेरीमुळेच हा विजय शक्य झाला आहे. पण पैशांचा वापर करून सामान्य जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यात भाजपाला यश आले."
"मी यंत्राचा विजय मान्य करतो"
आपल्या पराभवाचा स्वीकार करत गोटे म्हणाले, "मी यंत्राचा विजय मान्य करतो. हा विजय पैशांचा आणि तंत्रज्ञानाचा आहे. माझ्याकडून अशा प्रकारचा विजय कधीही मिळू शकला नसता, हे मी मान्य करतो. हा पराभव आयुष्यभर विसरणार नाही. कदाचित या दुःखाबरोबरच शेवटचा श्वास घ्यावा लागेल."
भविष्याची चिंता आणि जनतेला इशारा
गोटे यांनी त्यांच्या वक्तव्यातून राज्यातील जनता आणि कार्यकर्त्यांना सत्ताधारी पक्षाच्या धोरणांविरोधात उभे राहण्याचे आवाहन केले. "लोकशाही वाचवायची असेल तर सामान्य जनतेने पुढाकार घ्यायला हवा. अन्यथा, अशा प्रकारच्या सत्ताकारणामुळे महाराष्ट्राचा भवितव्य अंधारात जाणार आहे," असे त्यांनी सांगितले.
संपूर्ण राज्यात प्रतिक्रिया
अनिल गोटे यांच्या या परखड वक्तव्यामुळे राज्यभर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. भाजपाने मात्र या आरोपांना प्रतिसाद देणे टाळले आहे. सत्ताधारी पक्षाने आपला विजय जनतेचा कौल असल्याचे सांगत निवडणुकीत कोणत्याही गैरप्रकाराला नकार दिला आहे
-धुळे दपर्ण-