यावेळी रामपूर (उत्तर प्रदेश) येथील लोकसभेचे खासदार मौलाना मोहिदुल्ला नदवी, प्रसिद्ध शायर मुनव्वर राना यांच्या कन्या व महिला कार्यकर्ती सुमैया राणा, अलीगढ युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी नेते आणि समाजवादी पार्टीच्या अल्पसंख्याक सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यासीन माझी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून सभा गाजवली. या सभेत इर्शादभाई जहागीरदार यांना विधानभवनात पाठवून एक उच्चशिक्षित, निष्कलंक उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन करण्यात आले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
सभेत प्रमुख पाहुणे मौलाना नदवी यांनी आपले विचार व्यक्त करताना देशात वाढत्या धार्मिक ध्रुवीकरणावर चिंता व्यक्त केली. "सध्या देशात एक विषारी वातावरण तयार केले जात आहे ज्यामुळे समाजात तणाव निर्माण होत आहे," असे ते म्हणाले. "राजकीय फायद्यासाठी जात, धर्म या बाबींवरुन फूट पाडली जात आहे, हे देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत घातक आहे." त्याचबरोबर मौलाना नदवी यांनी समाजवादी पक्षाचे संस्थापक स्व. मुलायमसिंग यादव यांचे स्मरण करुन दिले. "मुलायमसिंग यादव हे नेहमीच अन्यायाविरुद्ध उभे राहिले. त्यांच्या कार्याची आणि विचारांची प्रेरणा समाजवादी पक्षाच्या आजच्या नेतृत्वातही दिसून येते," असे त्यांनी सांगितले.
यावेळी सुमैया राणा यांनी देखील सभा गाजवली. त्यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील मुस्लिम व अल्पसंख्याकांच्या अधिकारांबाबत जागरूकता आणि एकजुटीची गरज अधोरेखित केली. "समाजवादी पक्षाचे नेतृत्व नेहमीच मुस्लिम आणि अन्यायग्रस्त समाजाच्या बाजूने ठाम उभे राहिले आहे. यंदा धुळेकरांनी इर्शादभाई जहागीरदार यांच्या रूपाने एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष उमेदवार विधानभवनात पाठवावा," असे त्यांनी मत व्यक्त केले.
अलीगढ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे नेते आणि अल्पसंख्याक सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यासीन माझी यांनी सभेला संबोधित केले. "उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली भाजपला कडवी झुंज दिली. त्याचे उत्तम परिणाम पाहायला मिळाले. समाजवादी पक्षाने देशातील विविध भागांतील अल्पसंख्याक आणि अन्यायग्रस्त वर्गासाठी आपल्या विचारांची ताकद दाखवून दिली आहे," असे त्यांनी सांगितले. "महाराष्ट्रात अबू असीम आझमी हे अन्यायविरुद्ध ठामपणे भूमिका घेतात, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. धुळ्यातून देखील असाच आवाज बुलंद होण्यासाठी इर्शादभाई यांना निवडून देण्याची हीच योग्य वेळ आहे," असे आवाहन त्यांनी केले.
इर्शादभाई जहागीरदार यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, "धुळे शहराच्या हितासाठी मी सदैव तत्पर राहील. धुळेकरांच्या प्रगतीसाठी काम करणे, शहराच्या विकासाला चालना देणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. विधानभवनात निवडून गेल्यास, सामान्य जनतेच्या समस्यांचा आवाज बुलंद करणार आहे." तसेच, धुळे शहरातील जनतेने जो पाठिंबा दिला आहे, तो पाहून आत्मविश्वास वाढला असून या निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा त्यांनी दावा केला.
सभेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते, ज्यामुळे सभा अत्यंत यशस्वी ठरली. यावेळी इर्शादभाई जहागीरदार यांना पाठिंबा दर्शवणाऱ्या प्रमुख मान्यवरांमध्ये मौलाना मोहिबुल्ला नदवी, सुमैया राणा, यासीन माझी, सलीम हाफीज, गुड्डू भाई काकर, वसीम महमूद भाईजान, पप्पू मु अक्रम, मुला रमजान अन्सारी, अकील अन्सारी, अगिन पटेल, जगील मन्सूरी, शकील हवाईजहाज, सलीम टेलर, अखलाख अन्सारी, मोहम्मद सलमान, नवाब पठाण, गुलाम कुरेशी यांचा समावेश होता.
सभेच्या शेवटी मौलाना सञ्जद नोमानी यांनीही इर्शादभाई यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे, समाजवादी पक्षाने जनतेच्या कल्याणासाठी अनेक वर्षे निस्वार्थ कार्य केले आहे आणि यापुढेही करीत राहणार आहे, असे सांगून सर्वांनी एकजुटीने समाजवादी पक्षाचा विचार पुढे नेण्याचे आवाहन केले.
सभेच्या शेवटी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात टाळ्यांचा गजर करत इर्शादभाई यांना निवडून आणण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
