मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या संख्येत आणखी कपात होण्याची शक्यता आहे. राज्यभरातील छाननी प्रक्रियेच्या अनुषंगाने चालू महिन्यातच सुमारे दोन लाख महिलांना अपात्र ठरविण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये सहाय्य निधी देण्याचे आश्वासन दिले गेले. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा लाभ झाला. प्रारंभी २ कोटी ३१ लाख ८६० महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. मात्र, फेब्रुवारी महिन्यात राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या छाननीत अनेक महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे. यासंदर्भातील अहवाल महिला व बालविकास विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
अपात्र ठरणाऱ्यांची कारणे
या योजनेसाठी ठरविलेल्या निकषांनुसार, ६५ वर्षे पूर्ण केलेल्या महिला, कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी वाहन असलेल्या महिला तसेच इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे. याआधी झालेल्या छाननीत ५ लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आले होते, ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, नमोशक्ती योजना आणि स्वेच्छेने योजना सोडणाऱ्या लाभार्थींचा समावेश होता.
फेब्रुवारीचा हप्ता लवकरच
राज्यभरातील छाननीनंतर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तातडीने लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे. अर्थ विभागाने यासाठी आवश्यक निधीला मंजुरी दिली असून, लवकरच डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) च्या माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
प्राप्तिकर विभागाचा अहवाल प्रलंबित
महिला व बालविकास विभागाने काही दिवसांपूर्वी लाभार्थी महिलांची सविस्तर यादी प्राप्तिकर विभागाकडे सुपूर्द केली होती. या अहवालात संबंधित महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये पेक्षा जास्त आहे का, त्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत का, याची पडताळणी केली जाणार होती. मात्र, या अहवालाला विलंब होत असल्याचे समोर आले आहे.
![]() |
| - Advertisement - |
सरकारकडून या योजनेच्या लाभार्थ्यांची वेळोवेळी छाननी केली जात असून, फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी अधिक काटेकोर प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पुढील काही महिन्यांतही ही छाननी प्रक्रिया सुरूच राहणार असून, लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत आणखी काही बदल होण्याची शक्यता आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम


