धुळे दर्पण न्यूज :- धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून, यामुळे येथे वारंवार अपघात घडत आहेत. महामार्गावर अनेक ठिकाणी आवश्यक त्या सूचना फलकांचा व बॅरिकेटिंगचा अभाव असल्यामुळे वाहनचालकांना धोका निर्माण होत आहे. अशाच एका अपघातात बर्डीपाडा येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या टोलनाक्याजवळ मालट्रक पलटल्याची घटना घडली आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

अपघाताची घटनाः रस्ता अंदाज न आल्याने मालट्रक पलटला

  रात्री चार वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. सुरतहून मालेगावच्या दिशेने प्लास्टिक सामान घेऊन जाणारा मालट्रक (MH-41-AY-8060) या ठिकाणी आला असता, महामार्गावर कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शक सूचना फलक नव्हते. त्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही आणि वाहन थेट डिव्हायडरला धडकले. या धडकेत मालट्रक महामार्गावर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहन चालक किरकोळ जखमी झाला. अपघाताच्या तीव्रतेमुळे ट्रकचे पुढील टायर पूर्णपणे निखळले असून, वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.


महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे अपघातांना आमंत्रण

  बर्डीपाडा येथील टोलनाक्याचे काम अजूनही अपूर्ण असून, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नाही. महामार्गावर सतत अपघात घडत असतानाही प्रशासन आणि ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत आहेत. महामार्गावर सूचना फलक, मार्गदर्शक बॅरिकेटिंग किंवा इतर सुरक्षा उपाययोजना नसल्यामुळे वाहनचालक गोंधळून अपघातांना सामोरे जात आहेत.

- Advertisement -
वाहनधारकांमध्ये संताप; प्रशासनावर गंभीर आरोप

  या अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये संतापाची भावना दिसून आली. "महामार्गावर दररोज अपघात होत असले तरी जबाबदार अधिकारी आणि ठेकेदार मात्र गाढ झोपेत आहेत," अशी तीव्र प्रतिक्रिया वाहनधारकांनी व्यक्त केली आहे. "महामार्गावर काम सुरू आहे, पण त्याबाबत कोणतीही सूचना नाही. जर खबरदारी घेतली गेली असती, तर असे अपघात टाळता आले असते," असे मत एका वाहनचालकाने व्यक्त केले.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्वरित उपाययोजना कराव्यात

  धुळे-सुरत महामार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या ठिकाणी सतत होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागरिक आणि प्रवासी वर्गाकडून प्रशासनाने लवकरात लवकर येथे सूचना फलक, बॅरिकेट्स आणि इतर सुरक्षा यंत्रणा बसवावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा भविष्यात यापेक्षाही गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -