धुळे दर्पण न्यूज :-  महानगरपालिका हद्दीतील भूखंड माफियांना पाठीशी घालून राजवाडे संशोधन मंडळाकडून महानगरपालिकेच्या जागेचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे आयुक्त अमिता दगडे पाटील यांना निवेदन देण्यात आले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ ही जागा मनपाच्या ताब्यात घेऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी केली असून, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

निवेदनात काय म्हटले आहे?

  आरपीआयच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थेने दिनांक १० ऑक्टोबर २००३ रोजी ठराव क्रमांक ११५ अन्वये ६००० चौ. फुट जागा राजवाडे संशोधन मंडळाला कोणताही मोबदला न घेता पंधरा वर्षांसाठी दिली होती. मात्र, या निर्णयाला शासनाची मान्यता नव्हती. तरीदेखील बेकायदेशीर पद्धतीने सदर जागा मंडळाच्या ताब्यात देण्यात आली. हा करार २०१८ साली संपुष्टात आला असतानाही महानगरपालिकेने अद्याप जागा ताब्यात घेतली नाही.

- Advertisement -
पालिकेच्या दुर्लक्षामुळे बेकायदेशीर वापर

  सन २०१६ मध्ये नगरसेवकांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. २०१८ मध्ये कराराची मुदत संपूनही राजवाडे संशोधन मंडळाने सदर जागेचा बेकायदेशीर वापर सुरूच ठेवला आहे. विशेष म्हणजे, गेल्या २२ वर्षांपासून या जागेचा व्यापारी उपयोग होत असून, महानगरपालिकेने या काळातील कर आणि दंडात्मक रक्कम वसूल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

आरपीआयचा इशारा - अन्यथा जेसीबीद्वारे अतिक्रमण हटवू

  महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे भूखंड माफियांचा उत्साह वाढला असून, प्रशासन जाणूनबुजून या प्रकाराकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, लवकरात लवकर महानगरपालिका प्रशासनाने हे अतिक्रमण हटवावे, अन्यथा आरपीआय (आठवले गट) स्वतः जेसीबीद्वारे बांधकाम पाडेल, असा इशारा देण्यात आला आहे. होणाऱ्या प्रकाराची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनावर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले.

- Advertisement -
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

  या निवेदनाच्या वेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, महिला जिल्हाध्यक्ष नयना दामोदर, राजूबाबा शिरसाठ, प्रेमकुमार अहिरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -