धुळे दर्पण न्यूज :- धुळे जिल्ह्यात जैवविविधतेच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्था देवराई आणि जैवविविधता संवर्धन प्रकल्प राबविणार आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश स्थानिक पातळीवर पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांचे योगदान वाढवणे आणि देवराईंच्या स्वरूपात पारंपरिक वनसंस्कृती टिकवून ठेवणे हा आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
संस्थेच्या अध्यक्षा मिना भोसले यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, लळींग ते बारीपाडा या डोंगराळ परिसरात हा प्रकल्प राबवला जाणार असून, विविध सामाजिक संघटना, स्थानिक नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांच्या सहकार्याने वनसंवर्धन, वनस्वच्छता आणि जैवविविधतेचे संकलन केले जाणार आहे.
सरकारकडून २९ लाखांचा निधी, तीन वर्षांचा नियोजित प्रकल्प
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने या प्रकल्पासाठी २९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून तो टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे. हा प्रकल्प तीन वर्षे चालणार असून त्यात जनजागृती मोहीम, वृक्षारोपण, वनसंवर्धन, पथनाट्य, व्याख्याने, स्वच्छता मोहीम, कार्यशाळा आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
दहा गावे दत्तक, प्रथम कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद
सप्तशृंगी महिला संस्थेने दहा गावे दत्तक घेतली असून, प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात बारीपाडा येथे पद्मश्री पुरस्कार विजेते श्री. चैत्राम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत शंभर बचत गटांच्या महिलांनी सहभाग घेतला आणि देवराई संवर्धनाची शपथ घेतली.
या कार्यशाळेत चैत्राम पवार, मिना भोसले, संगीता चौरे, अॅड. आर. बी. जाधव आणि अॅड. अनिल जगताप यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेनंतर किल्ले लळींग संवर्धन समिती, मी धुळेकर संघटना, लळींग प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य, स्वच्छता मोहीम आणि व्याख्यानांद्वारे जनजागृती केली.
देवराई म्हणजे निसर्गाचा शाश्वत वारसा
या प्रकल्पाद्वारे प्रत्यक्ष देवराई निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. देवराई म्हणजे पारंपरिक भारतीय वनसंस्कृतीचे प्रतीक असून, त्यात वड, पिंपळ, औदुंबर, आंबा, आवळा यांसारख्या महत्त्वाच्या वृक्षांची लागवड करून ती संवर्धित केली जाणार आहे.
धुळे जिल्ह्यातील देवराईंचे सर्वेक्षण आणि धोरणात्मक नियोजन
या उपक्रमांतर्गत धुळे जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या देवराईंची माहिती संकलित केली जाणार आहे. जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने धोरण आखण्यात येईल, तसेच नवनवीन देवराई निर्माण करून त्या पर्यावरणपूरक पद्धतीने विकसित करण्यासाठी संस्थेने संकल्प केला आहे.
स्थानीय महिलांना पर्यावरण रक्षणाची संधी
सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या या उपक्रमामुळे स्थानिक महिला आणि वनप्रेमींना पर्यावरण रक्षणाच्या कार्यात पुढाकार घेण्याची संधी मिळणार आहे. “जैवविविधतेचे जतन आणि संवर्धन हे भविष्यातील पिढ्यांसाठी आवश्यक आहे, त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमाला पाठिंबा द्यावा,” असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा मिना भोसले यांनी केले
.
(प्रतिनिधी - धुळे दर्पण)
