धुळे दर्पण न्यूज :-  शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालली आहे. शहरातील रस्त्यांवर ट्राफिक सिग्नल बंद पडले आहेत, रस्त्यावर बेकायदेशीररित्या हातगाड्या उभ्या आहेत, अवजड वाहने शहरात बिनधास्त फिरत आहेत, पार्किंगची कोणतीही ठोस सुविधा नाही, परिणामी नागरिकांना वाहतुकीच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे धुळे शहरातील वाहतूक व्यवस्था रामभरोसे झाली आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp: `

  या परिस्थितीत सुधारणा व्हावी आणि वाहतूक व्यवस्थेला कठोर शिस्त लागावी, या मागणीसाठी महानगर नागरी हक्क संघर्ष समितीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक दिली. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर काळे यांना निवेदन दिले आणि तातडीने योग्य त्या उपाययोजना राबविण्याची मागणी केली.


शहरात वाहतुकीला नियम नाहीत, कायदा नाही!

  महानगर नागरी हक्क संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनात शहरातील वाहतूक व्यवस्थेवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. "धुळे शहरातील वाहतुकीला कोणतीही शिस्त राहिलेली नाही. वाहतूक नियम आणि कायदे अस्तित्वातच नाहीत, असेच वाटते. जणू सरकारने धुळे शहराला वाहतुकीच्या नियमांपासून सूट दिलेली आहे." असा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.


  संपूर्ण शहरात केवळ तीन-चार ट्रॅफिक सिग्नल कार्यरत आहेत, तेही बहुतेक वेळा बंद असतात. शहरात नो-एंट्री झोन नाहीत, एकेरी वाहतुकीचे रस्ते नाहीत, पार्किंग झोन आणि नो-पार्किंग झोन नाहीत, टोइंग वाहने नाहीत, जॅमर नाहीत. त्यामुळे वाहने कुठेही पार्क केली जात आहेत, रिक्षा मनाला येईल तिथे थांबवल्या जात आहेत आणि वाहतूक पोलिसांकडून याकडे संपूर्ण दुर्लक्ष होत आहे.



वाहतूक पोलिसांची निष्क्रियता शहराला महागात

  धुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी वाहतूक शाखा कार्यरत असली तरी या शाखेतील जवळपास ७० पोलिस कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत नाहीत, असा गंभीर आरोप समितीने केला आहे.


  "शहरात वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिस आहेत, पण ते फक्त नावालाच! त्यांना नेमून दिलेली जबाबदारी ते प्रामाणिकपणे पार पाडत नाहीत. ट्रॅफिक जामच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. विशेषतः शाळांच्या वेळेत शाळांसमोर पालकांच्या वाहनांची गर्दी होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात वाहतुकीचा गोंधळ उडतो. शाळांच्या मुख्याध्यापकांनी पालकांची वाहने शाळेच्या आत उभी करण्याच्या सूचना द्याव्यात."

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

वाहतुकीच्या सुधारणा करण्यासाठी समितीच्या ठोस मागण्या:

  महानगर नागरी हक्क संघर्ष समितीने शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलिस प्रशासनासमोर ठोस मागण्या मांडल्या आहेत.


1. बंद असलेले ट्राफिक सिग्नल त्वरित सुरू करावेत आणि आवश्यक ठिकाणी नवीन सिग्नल बसवावेत.

2. तालुका पोलीस ठाण्यासमोरील चौकात नवीन सिग्नल बसवावा.

3. नो-एंट्री झोन तयार करून अवजड वाहनांना सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान शहरात प्रवेश बंद करावा.

4. रिक्षाचालकांना ठराविक थांब्यावरच रिक्षा उभी करण्याची सक्ती करावी.

5. शहरातील प्रमुख भागांत वाहनांसाठी पार्किंग-नो पार्किंग झोन तयार करावे आणि त्याची कडक अंमलबजावणी करावी.

6. आग्रारोडवर सम-विषम पार्किंग व्यवस्था लागू करावी.

7. बेकायदेशीर पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोइंग वाहने आणि जॅमरची व्यवस्था करावी.

8. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून रोख दंड वसूल करावा आणि वारंवार नियम तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.

9. रहदारीस अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या, हॉकर्स आणि टपऱ्यांवर कडक कारवाई करावी.

10. वाहतूक शाखेची गाडी दिवसभर शहरात गस्त घालण्यासाठी फिरती ठेवण्यात यावी.

- Advertisement -
पोलिस प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जाणार?

  या आंदोलनानंतर पोलिस प्रशासन आता कोणती पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी समितीच्या मागण्यांची दखल घेतली असून, लवकरच आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे.


  धुळे शहरातील नागरिकांना सुसाट आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था मिळावी, यासाठी पोलिसांनी ठोस कृती करावी, अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम