धुळे दर्पण न्यूज :- महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत धुळे शहरातील दोन प्रतिभावान मल्लांनी अप्रतिम प्रदर्शन करत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. पै. शेखर गवळी यांनी ८६ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवत धुळे जिल्ह्याचा कुस्ती इतिहास पुन्हा सुवर्णाक्षरांनी लिहिला. तसेच पै. पुरुषोत्तम विसपुते यांनी ६१ किलो वजनी गटात अंतिम फेरीपर्यंत मजल मारून रौप्यपदक पटकावले. या दोघांच्या यशाने संपूर्ण धुळे शहरात आनंदाचे वातावरण आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या ऐतिहासिक विजयाच्या निमित्ताने रविवार, ९ फेब्रुवारी रोजी धुळे शहरात मिरवणुकीसह दोन्ही मल्लांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पै. आकाश परदेशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शहरातील मरीमाता चौक, गल्ली नं. ४ येथे सायंकाळी ७ वाजता सत्कार समारंभ पार पडणार आहे. या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित राहणार असून धुळेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुवर्णक्षणाचा साक्षीदार व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
धुळेच्या कुस्ती क्षेत्रात ऐतिहासिक क्षण
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मिळवलेल्या या ऐतिहासिक यशामुळे ४०-४५ वर्षांनंतर धुळे जिल्ह्याने राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकले आहे. यापूर्वी पै. राजधर कोळी यांनी अशी कामगिरी केली होती. पै. शेखर गवळी यांच्या विजयाने जिल्ह्यात कुस्तीचे नवचैतन्य निर्माण झाले आहे. पै. पुरुषोत्तम विसपुते यांनी देखील आपल्या निर्धाराने आणि मेहनतीने रौप्य पदक मिळवत आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पायाभरणी केली आहे.
मिरवणुकीचा थाटमाट
सत्कार समारंभापूर्वी मनोहर चित्रमंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ओपन जिप्सीमधून ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरणार असून खंडेराव मंदिर, आग्रा रोड, गांधी पुतळा मार्गे गल्ली नं. ४ येथे समारोप होईल. या मिरवणुकीत कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
परिश्रम, जिद्द आणि कुटुंबीयांचे पाठबळ
पै. शेखर गवळी यांनी सांगितले की, त्यांच्या यशामागे आई-वडील, भाऊ चेतन गवळी आणि प्रशिक्षक संजय पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. एकनाथ विजय व्यायामशाळेत त्यांनी कठोर मेहनत घेतली. २०१९ मध्ये दिल्ली येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या कुस्ती कारकिर्दीला नवीन दिशा मिळाली. २०२१ मध्ये सांगली येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्यांनी रौप्य पदक मिळवले होते.
तसेच पै. पुरुषोत्तम विसपुते यांची यशोगाथा देखील प्रेरणादायी आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वडील रिक्षा चालक आणि आई पेट्रोल पंपावर काम करणारी असूनही त्यांनी कुस्तीचा नियमित सराव सुरू ठेवला. हर हर महादेव विजय व्यायामशाळेत प्रशिक्षक संजय पाटील आणि प्रशांत फटकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रगती केली. योग्य आहार आणि आर्थिक सहाय्य मिळाल्यास पै. विसपुते पुढील स्पर्धेत निश्चित सुवर्णपदक जिंकू शकतील, असा विश्वास आकाश परदेशी यांनी व्यक्त केला.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार रावल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे, भाजप महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.
धुळेकरांसाठी अभिमानाचा क्षण
धुळे जिल्ह्याच्या कुस्ती इतिहासात सुवर्णअध्याय लिहिणाऱ्या पै. शेखर गवळी आणि पै. पुरुषोत्तम विसपुते यांचा भव्य नागरी सत्कार हा संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे. धुळेकरांनी या सोहळ्याला उपस्थित राहून या मल्लांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
— प्रतिनिधी, धुळे दर्पण
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम


