"लाडक्या बहिणींसाठी रस्त्यावर रणसंग्राम! २१०० रुपये तात्काळ द्या – राष्ट्रवादी शरद पवार गट"

  धुळे दर्पण न्यूज :- (प्रतिनिधी) महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी महिलांसाठी मोठ्या आश्वासनांची खैरात केली होती. त्यातील सर्वात महत्त्वाचे व आकर्षक आश्वासन म्हणजे 'लाडकी बहिण योजना', ज्या अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता सरकार या आश्वासनावर मागे फिरत असून वेगवेगळ्या निकषांद्वारे अनेक पात्र महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत. हे थांबवावे आणि सर्व पात्र महिलांना विनाअट सरसकट २१०० रुपये मिळावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने करण्यात आली आहे.


राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आक्रमक पवित्रा

  धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की, निवडणुकीपूर्वी मोठा गाजावाजा करत महिलांकडून अर्ज भरून घेण्यात आले. लाखो महिलांनी आवश्यक कागदपत्रे जोडून फॉर्म भरले, त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चही केला. मात्र, आता सत्तेवर येताच महायुती सरकारने बहिणींच्या आशाआकांक्षांना तडा देण्याचे काम सुरू केले आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

महिला अर्ज नाकारण्याचे गुप्त डावपेच?

  महिलांच्या अर्जांसाठी वेगवेगळे निकष लावले जात असून, ट्रॅक्टर, चारचाकी, शेती, इन्कम टॅक्स भरला असल्यास किंवा इतर काही निकष लागू असल्यास अर्ज फेटाळला जात आहे. हा प्रकार म्हणजे गरिब महिलांची फसवणूक असून, निवडणुकीच्या आधी मोठ्या थाटामाटात जाहीर केलेले आश्वासन हवेत विरले आहे. महिलांनी फॉर्म भरताना विश्वास ठेवला होता की, सरकार त्यांना दरमहा २१०० रुपये देईल, मात्र आता अटी-शर्ती लावून त्यांची फसवणूक सुरू आहे.


'सर्व पात्र महिलांना लाभ मिळालाच पाहिजे' – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

  राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात सरकारवर आरोप करत म्हटले आहे की, "हे आश्वासन म्हणजे केवळ निवडणुकीसाठी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार होता. महायुती सरकारने त्वरित हे धोरण बदलावे आणि सर्व पात्र महिलांना सरसकट २१०० रुपये द्यावेत."

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  शिष्टमंडळाने मागणी केली की, आतापर्यंत ज्या महिलांना ही रक्कम मिळाली आहे, त्यांना यापुढेही नियमित मिळाली पाहिजे. कोणतेही नवीन नियम लागू करून लाभधारक महिलांची संख्या कमी करू नये. तसेच, यापूर्वी ज्यांना अर्ज नाकारण्यात आले आहेत, त्यांचे अर्ज पुनर्पडताळणी करून त्यांनाही या योजनेचा लाभ द्यावा.


सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा

  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने इशारा दिला की, जर सरकारने तातडीने या निर्णयात बदल केला नाही, तर पक्षाच्या वतीने गोरगरीब, गरजू आणि वंचित महिलांना एकत्र करून मोठे जनआंदोलन उभारले जाईल. सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील.

- Advertisement -

नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

  या आंदोलनात आणि निवेदन सादरीकरणाच्या वेळी जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्यासह दीपक देवरे, राजेंद्र डोमाडे, रामेश्वर साबरे, बंटी वाघ, अशोक धुलकर, भिका नेरकर, कृष्णा ठाकरे, जमीर शेख, डॉमिनिक मलबारी, बरकतअली शाह, शोएब अन्सारी, अशोक गवळे, डी.टी. पाटील, युनूस शेख आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


'लाडक्या बहिणींना फसवू नका... २१०० रुपये द्या!'

  या घोषणांनी परिसर दणाणून गेला. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, सरकार या मागणीवर काय भूमिका घेते आणि महिलांना त्यांचा हक्क मिळतो की नाही.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम