धुळे दर्पण न्यूज :-  भगवान झुलेलाल मंदिर ट्रस्टतर्फे ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात सामूहिक बहराणो साहेब पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी, १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता धुळ्यातील विद्यावर्धिनी कॉलेजच्या पटांगणावर हा धार्मिक सोहळा संपन्न होणार आहे. या पूजेसाठी देशभरातील ११११ जोडपी सहभागी होणार असून, यामध्ये पती-पत्नींसह मित्र, भाऊ-बहिण यासारख्या इतर नात्यांतील जोडपीही पूजेला बसणार आहेत.


संत-महंतांचा मोठा मेळावा

  या भव्य पूजेसाठी संपूर्ण देशभरातील संत-महंत आणि धार्मिक गुरूंना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये चकरभाटा (छत्तीसगड) येथील संत शिरोमणी सांई लालदास, उल्हासनगर येथील सांई वसणशाह दरबारचे संत सांई छोटूराम, अहमदाबादचे सांई जगदिशलाल, पिंपरी-पुण्याचे सांई सोनुराम, नागपूरचे फकीरा सांई, धुळेचे बाबा जुगतराम, कोल्हापूरच्या पुष्पा दीदी, उल्हासनगरचे भाऊ लीलाराम यांच्यासह २०-२५ संत-महात्म्यांचे धुळे नगरीत आगमन होणार आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

भगवान झुलेलालसाठी दानशूरांचे मोठे योगदान

  या पूजेसाठी दानशूर भक्तांनी मोठ्या प्रमाणावर मदतीचा हात पुढे केला आहे. १२०० भगवान झुलेलाल यांची मूर्ती, तसेच चांदीचे चिक्के या पूजेसाठी पाठविण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार तसेच इतर राज्यांतील भाविक या पूजेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


आयोजनासाठी भव्य तयारी

  विद्यावर्धिनी कॉलेजच्या पटांगणावर ६०० टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून, ११११ परिवार जोडीने पूजा बसणार आहेत. या भव्य आयोजनासाठी १३ समित्या कार्यरत असून, ४०० हून अधिक सेवेकऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी कुमार नगर येथील बहावलपुरी पंचायत भवन, तेरापंथ भवन, सिंधू भवन, एस.एस.डी. धाम, बाबा हरदासराम धाम, तसेच पूज्य सिंधी जनरल पंचायत हॉल येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

महाप्रसाद व भक्तीसंगीत कार्यक्रम

  पूजेनंतर भगवान झुलेलाल मंदिर हॉल आणि सिंधी जनरल पंचायत हॉलमध्ये महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. तसेच, संध्याकाळी ४ वाजता मुंबई व उल्हासनगर येथील कलाकार भक्तीसंगीत कार्यक्रम सादर करणार आहेत.


शोभायात्रेने सोहळ्याची सांगता

  पूजा समाप्त झाल्यानंतर संध्याकाळी ७:३० वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. भाविक प्रज्वलित बहराणो साहेब डोक्यावर धारण करून या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. यात्रा वाजत-गाजत कुमार नगर येथील पांझरेच्या झुलेलाल घाटावर पोहोचेल, जिथे सर्व बहराणो साहेब नदीत प्रवाहित केले जातील.

- Advertisement -

महाकुंभचा विशेष अनुभव

  जे भाविक प्रयागराज येथे जाऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी प्रयागराज, नाशिक, त्र्यंबकेश्वर, प्रकाशा आणि लेह-लडाख येथील सिंधू नदीचे पवित्र जल धुळ्यात आणले आहे. या सर्व जलांचे एकत्रित पूजन करून उपस्थित भाविकांवर अभिषेक केला जाईल, ज्यामुळे कुंभस्नानाची अनुभूती मिळेल.


सिंधी समाजाच्या एकतेचा संदेश

  या ऐतिहासिक पूजेसाठी भगवान झुलेलाल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाशलाल छेतिया, सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष गुलशन उदासी, फेडरेशन ऑफ वर्ल्ड सिंधी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य सुरेश कुंदनाणी, देवानंद नानकाणी, मनोहर सुखिया, उत्तम वच्छाणी, रमेशलाल चंदनाणी, पंकज दुल्हाणी आदी मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. सिंधी समाज संघटित व्हावा हा या पूजेचा मुख्य उद्देश असून, अशा भव्य आयोजनामुळे समाजामध्ये ऐक्य आणि भक्तिभाव वाढीस लागेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


- सैय्यद सानिल, धुळे दर्पण

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम