धुळे दर्पण न्यूज :-  काल दिनांक १ मार्च २०२५ रोजी धुळे लोकसभा खासदार मा. डॉ. सौ. शोभा दिनेश बच्छाव यांनी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला अचानक भेट दिली. या दौऱ्यात महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ, मंत्रालय मुंबईच्या वतीने संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.


  संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. गिरीश भाऊ चौधरी आणि राज्य कोषाध्यक्ष श्री. चंद्रकांत भदाणे यांनी मा. खासदार बच्छाव मॅडम यांना निवेदन सादर केले. या निवेदनात मुख्यतः कर्मचाऱ्यांच्या सेवा-सुविधा, रिक्त पदे भरती, आरोग्यसेवा सुधारणा आणि निवृत्तीविषयक मागण्या यांचा समावेश होता.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

प्रमुख मागण्या:

१) सेवा निवृत्ती अथवा स्वेच्छानिवृत्ती कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सरकारी सेवेत संधी: 

  शासन निर्णय दिनांक १४ एप्रिल १९८१ नुसार, सेवा निवृत्त, वैद्यकीय दृष्ट्या अपात्र किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास विनाअट शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे.


२) राज्य शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावीत: 

  विशेषतः वर्ग ३ आणि वर्ग ४ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात यावी.


३) कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उपलब्ध करून द्यावीत.


४) वर्ग ३ कर्मचाऱ्यांची निवृत्ती वयोमर्यादा ५८ वर्षांवरून ६० वर्षांपर्यंत वाढवावी.


५) रुग्णालयातील लिफ्ट सेवा सुरळीत सुरू करावी: 

  सध्या १६ पैकी केवळ १ लिफ्ट कार्यरत आहे. उर्वरित १५ लिफ्ट बंद असल्याने आपत्कालीन रुग्णवाहतुकीत अडथळे येत असून, वेळेत उपचार न मिळाल्यास गंभीर परिणाम संभवतात. त्यामुळे सर्व लिफ्ट तातडीने कार्यान्वित करण्यात याव्यात.


६) कोविड काळातील कर्मचारी समस्यांवर तोडगा: 

  कोविड काळात सेवेत असताना मृत्यू पावलेल्या तसेच आजारी पडलेल्या वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांना तीन वेतनवाढी मिळाव्यात.

- Advertisement -
७) रजा रोखीकरण मर्यादा वाढवावी: 

  सध्या ३०० दिवसांचे रजा रोखीकरण देण्यात येते. त्याऐवजी ६०० दिवसांचे रोखीकरण देण्यात यावे.


८) एस.टी. बससेवा पुन्हा सुरू करावी: 

  पूर्वी सुरू असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस सेवा पुन्हा सुरू करावी, जेणेकरून महिला कर्मचारी व रुग्णांच्या प्रवासास सुलभता येईल.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

खासदार बच्छाव यांचे सकारात्मक आश्वासन

  या बैठकीदरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. मा. खासदार डॉ. सौ. शोभा बच्छाव मॅडम यांनी सर्व मागण्यांवर गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. प्रशासन आणि संबंधित विभागांशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.


बैठकीस मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित

  या वेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. गिरीश भाऊ चौधरी, राज्य कोषाध्यक्ष श्री. चंद्रकांत भदाणे, श्री. कृष्णा शिंदे, श्री. देवा भाऊ पिनियार, श्री. धीरज भाऊ चव्हाण, श्री. प्रमोद भाऊ चांगरे, श्री. दिग्विजय गोयल, श्री. दुर्गेश लोखंडे तसेच मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -
  खासदार बच्छाव यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेतला जातो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम